

पिंपरी: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प गेल्या 15 वर्षांपासून ठप्प आहे. हा 400 कोटी रुपयांचा प्रकल्प तब्बल 1 हजार 200 कोटी रुपये खर्चावर जाऊन पोहचला आहे. त्यासाठी केंद्राच्या अर्बन चॅलेज फंडातून निधी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळे ठेकेदार नेमण्यात येणार आहेत. एका कामाचे तीन तुकडे करून त्या नियोजित कामांसाठी अर्थसंकल्पातील निधीत 121 कोटी रुपये 15 लाख रुपयांची तरतूद वाढ करण्यास स्थायी समितीने बुधवार (दि.5) मान्यता दिली. त्यामुळे निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते. महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबवण्याबाबत सर्व तयारी करून ठेवण्यात येत आहे. त्याला प्रशासनाकडून अधिक वेग आला आहे. तो प्रकल्प 15 वर्षांपासून ठप्प आहे. यापूर्वी झालेला खर्च वगळून सदयस्थितीत जेएनएनयूआरएम-पाणीपुरवठा टप्पा एक या खात्यामध्ये पवना प्रकल्पासाठी 516 कोटी 31 लाख रुपये जमा आहेत. सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पात 124 कोटी 55 लाख एवढी अंदाजपत्रकीय तरतूद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 391 कोटी 76 लाख एवढी रक्कम या खात्यामध्ये अजूनही जमा आहे. या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्यासाठी अंदाजपत्रकीय रकमेच्या 25 टक्के म्हणजे 375 कोटीची रक्कम चालू आर्थिक वर्षात असणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या 15 मे 2026 च्या सभेत या प्रकल्पासाठी सुधारित अंदाजपत्रकीय 1 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, सन 2026-27 च्या सुधारित अर्थसंकल्पात तरतूद कमी असल्याने या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करता येत नाही. त्यामुळे महापालिका फंडातील पाणीपुरवठा विशेष याजेना लेखाशिर्षातून जेएनएनयुआरएम-पाणीपुरवठा टप्पा एक या लेखाशिर्षामध्ये वर्ग केल्यास पवना प्रकल्पासाठीच्या उपलब्ध निधीमध्ये वाढ-घट करून त्या प्रकल्पास सन 2026-27 साठी आवश्यक तरतूद उपलब्ध करता येऊ शकते. या प्रकल्पाची निकड लक्षात घेऊन हे काम तीन टप्प्यात करून प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक कामासाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे. त्या कामांसाठी एकूण 121 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
..असा आहे बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प
निगडी, प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून मावळ तालुक्यातील पवना धरणापर्यंत 34.71 किलोमीटर अंतराची 1800 मिलिमीटर व्यासाची समांतर भूमिगत जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यापैकी 4.40 किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीचे शहरातील काम झाले आहे. शहर हद्दीबाहेरील उर्वरित 30.31 किलोमीटर अंतर जलवाहिनी टाकणे अद्याप बाकी आहे. त्यासाठीची सर्व जागा ताब्यात असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी केला आहे. तसेच, पवना धरणाजवळ अशुद्ध जलउपसा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जॅकवेल, पंपिंग स्टेशन व ब्रेक प्रेशर टाकी बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. त्यासाठी तीन वेगवेगळे ठेकेदार नेमले जाणार आहेत. हा प्रकल्प वेगात तसेच, कमी मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अंतिम तोडग्यानंतर जलवाहिनीचे काम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम तोडग्यानंतर पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी शेतकर्यांना विश्वासात घेतले जाणार आहे. काम मुदतीमध्ये पूर्ण व्हावे म्हणून कामाचे तीन तुकडे करून वेगवेगळे तीन ठेकेदार नेमले जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्प वेगात पूर्ण होणार आहे. प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तितक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवता येणार आहे. प्रकल्पासाठी जुने लोखंडी पाईप वापरण्यात येणार आहेत, असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.
तपशील-निधीची तरतूद
पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमणे: 1 कोटी 15 लाख रुपये
पवना धरणामध्ये इंटेल वेल, जॅकवेळ राझजिंग मेन, बीपीटी, पंगिंग स्टेशन व हेड वर्क : 20 कोटी रुपये
पवना धरणातील बीपीटीपासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गापर्यंत 1800 मिलीमीटर व्यासाची समांतर जलवाहिनी टाकणे : 40 कोटी रुपये
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गापासून निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रापयंत 1800 मिलीमीटर व्यासाची समांतर जलवाहिनी टाकणे : 60 कोटी रुपये
एकूण वाढीव निधीची तरतूद : 121 कोटी 15 लाख रुपये