

उर्से मावळ: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परंदवडी-सोमाटणे हा महत्त्वाचा रस्ता अत्यंत खराब झाला असून, परंदवडीजवळील ओढ्याच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठंमोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचा तोल जाऊन ते पडल्याच्या घटना घडल्या असून, काही जण जखमी झाले आहेत. तसेच, दुचाकी वाहनांचेही नुकसान होत आहे. चारचाकी आणि मालवाहू वाहनांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, टायर, सस्पेन्शन आणि इतर यांत्रिक भागांचे नुकसान झाल्याने वाहनचालकांना आर्थिक फटका बसत आहे.
परिसरात वाहतूककोंडी
या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी, चारचाकी, शालेय वाहने, औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी तसेच मालवाहतूक करणाऱ्या ट्रकची वर्दळ असते. मात्र, रस्ता वाहून गेल्याने आणि खड्ड्यांमुळे वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहेत. परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, अनेक वेळा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि पाणी साचल्याने पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा सुरू असतानाच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहून गेलेल्या भागाची पुनर्बांधणी करावी, मोठे खड्डे बुजवावेत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सोमाटणे फाटा-परंदवडी हा अत्यंत वर्दळीचा आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग आहे. रस्ता वाहून गेल्याने आणि ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी.
मनीषा मुऱ्हे, सदस्या, जिल्हा परिषद सोमाटणे फाटा-परंदवडी
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र, प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
रामभाऊ सावंत, तालुकाप्रमुख, शिवसेना