

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात होणारी गळती व चोरी रोखण्यासाठी महापालिकेने नळजोड शोध मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत शहरात 20 हजार नळजोड अनधिकृत सापडले आहेत. त्यातील 1 हजार 347 नळजोड नियमित करून पाणीमीटर बसविण्यात आले आहेत. शहरात 30 हजारांहून अधिक नळजोड अनधिकृत असल्याचा अंदाज आहे. अनधिकृत नळजोड शोधून ते नियमित करण्यासाठी महापालिका तब्बल 32 कोटी रुपये खर्च करत आहे.
त्यानंतर पालिकेने अधिकृत नळजोड नियमित करण्याचे काम ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनधिकृत नळजोड सर्वेक्षण आणि मीटर बसविणे यासाठी निविदा प्रसिध्द केली होती. 32 कोटी रुपयांचे हे काम एस. एस. साठे इन्फ्रा प्रा. लि. या ठेकेदाराला दिले आहे. कामाचा आदेश 4 डिसेंबर 2024 ला दिला आहे. (Latest Pimpri News)
मागील सात महिन्यांपासून सर्वेक्षण सुरू आहेत. आत्तापर्यंत 20 हजार अनधिकृत नळजोड आढळून आले आहेत. त्यापैकी 1347 नळजोड अधिकृत करून मीटर बसविण्यात आले आहेत. त्यांना पाणी पट्टीची आकारणी सुरू केली आहे.
उर्वरित अनधिकृत नळजोडांची पडताळणी करण्यात येत आहेत. मालमत्ताकराची बिल, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, वीजबिल ही कागदपत्रे घेऊन नळजोड अधिकृत केली जात आहेत. तर, झोपडपट्टी क्षेत्रातील नवीन नळजोडसाठी अनामत आणि दंडाची रक्कम न घेता मीटरविरहित नळजोड देण्यात येत आहेत.
शहरात 7 लाख 31 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सुमारे दोन लाख अधिकृत नळजोडधारकांची संख्या आहे. हाऊसिंग सोसायट्टा आणि अनधिकृत नळजोडांमुळे मालमत्तांच्या तुलनेत नळजोडांची संख्या कमी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. शहराला मागील सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. एकूण 30 टक्के पाण्याची गळती व चोरी होत असल्याचे वारंवार सांगितले जाते.
मावळातील पवना धरणातून 520 एमएलडी, आंद्रा धरणातून 90 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 20 एमएलडी असे एकूण 630 एमएलडी पाणी दररोज शहराला दिले जाते. या पाण्यापैकी 30 टक्के गळती व चोरी होत असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. अधिकृत नळजोड बसविल्यानंतर शहरातील पाणीगळती व चोरी कमी होईल. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल. महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
शहरातील नळजोड
20 हजार अनधिकृत नळजोड सापडले
1 हजार 347 नळजोड नियमित केले
30 हजारांपेक्षा अधिक अनधिकृत नळजोड असल्याचा अंदाज
अधिकृत 2 लाख निवासी व बिगरनिवासी नळजोड