

संतोष शिंदे
पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिलांवर सासरी होणार्या छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात समाजमाध्यमांपासून राजकीय आणि सामाजिक संस्थांपर्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याच पार्श्वभूमीवर ‘पुढारी’ने राज्यातील आत्महत्या प्रकरणांचा विशेष आढावा घेतला असता केवळ महिलाच नव्हे, तर काही पुरुषांनीही पत्नी व सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. त्यामुळे छळ हा लिंग आधारित नसून माणसाच्या प्रवृत्तीवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. (Latest Pimpri News)
वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. तिचा पती शशांक, सासरा राजेंद्र, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिष्मा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार, हुंडा प्रथा आणि सासरचा छळ यावर समाजव्यापी चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, ‘पुढारी’च्या तपासणीत असे लक्षात आले की, पिंपरी-चिंचवड परिसरात काही पुरुषांनी पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटना केवळ महिलांनाच नव्हे, तर पुरुषांनाही सासरकडून होणार्या मानसिक छळाचा सामना करावा लागतो, हे अधोरेखित करतात.
थेरगाव
पैशांच्या कारणावरून सासरच्यांनी जावयाचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे मुकेश धनीराम शर्मा (34, रा. थेरगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांचा भाऊ राजकुमार शर्मा यांनी वाकड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वाकी बुद्रुक (खेड)
पत्नी आणि तिच्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळून नितीन सुंदर जाधव यांनी आत्महत्या केली. चाकण पोलिस ठाण्यात नितीन यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी, साडू, मेहुणा आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी
पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रसाद उमेशराव देशमुख (34) यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आईने सांगवी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पत्नी, सासू आणि आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी प्रकरणात कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. कोणताही छळ सहन केला जाणार नाही. पोलिस तपासात लिंगभेद नसून पुराव्यांच्या आधारेच पावले उचलली जातील.
- विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
मानसिक छळ ही सौम्य वाटणारी पण दीर्घकालीन ताण निर्माण करणारी हिंसा आहे. विवाहसंबंधात दोन्ही पक्षांनी भावनिक समतोल राखणे गरजेचे असते. पुरुषही छळाचा बळी ठरू शकतात, पण ‘पुरुषत्वा’च्या सामाजिक अपेक्षांमुळे ते वेदना व्यक्त करत नाहीत. सतत अपमान, दोषारोप, भावनिक अडचणी यामुळे नैराश्य, आत्मस्मान हरपणे आणि आत्महत्येचे विचार उद्भ्वतात. त्यामुळे अशा प्रकरणांकडे केवळ लिंग आधारे न पाहता मानसिक आरोग्याच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
- डॉ. पूजा मिसाळ, डायरेक्टर ऑफ मेडिसिन, वृद्धावस्था मेंदू व मनोविकार तज्ञ, पिंपरी-चिंचवड.
हुंडा आणि सासरचा छळ या गंभीर सामाजिक समस्या नक्कीच आहेत; मात्र त्याचवेळी कायद्याचा गैरवापर हाही तितकाच धोकादायक प्रश्न बनत चालला आहे. खोट्या तक्रारींमुळे अनेक पुरुष आणि त्यांची कुटुंबे विनाकारण बदनाम होत आहेत. काही महिलांनी ‘कायदा’ हे संरक्षणात्मक शस्त्र न ठेवता ते हत्यार म्हणून वापरण्याची प्रवृत्ती स्वीकारली आहे. आमच्याकडे अशा तक्रारी नियमितपणे येत असतात. अनेक निर्दोष कुटुंबांचा यात नाहक बळी जातो आहे. त्यामुळे केवळ महिलांचे म्हणणे एकतर्फी स्वीकारून कारवाई करणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक प्रकरणात दोन्ही बाजूंचा निष्पक्ष आणि सखोल तपास होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, खोट्या तक्रारींमुळे खरे पीडितही न्यायापासून वंचित राहतील.
- नीता परदेशी, अध्यक्षा, वुमन्स हेल्पलाईन, पिंपरी-चिंचवड
सासरचा जाच ही केवळ महिलांचीच नव्हे, तर काही पुरुषांचीही दुर्दैवी वस्तुस्थिती बनली आहे. छळ करणार्याचे लिंग न पाहता त्याच्या वर्तनावर आणि मानसिक परिणामांवर भर देणे ही काळाची गरज आहे. न्यायसंस्था, पोलिस आणि समाजाने केवळ एकाच बाजूला न झुकता प्रत्येक प्रकरणाचा तटस्थ आणि मानवी मूल्यांवर आधारित विचार केला पाहिजे. वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे; पण त्याचवेळी पुरुषांचाही आवाज ऐकला गेला पाहिजे.
- अॅड.अतिश लांडगे, पिंपरी-चिंचवड