how nilesh Chavan is arrested
पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी नीलेश चव्हाण याला अखेर नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी त्याने अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनपूर्वक पलायनाची आखणी केली होती. मात्र, आयफोनवरील फेसटाइम कॉल त्याच्या अडचणीचे कारण ठरले. पोलिसांनी लॉजमध्ये झोपलेल्या अवस्थेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आल्यापासून नीलेश चव्हाण सातत्याने पोलिसांना चकवा देत होता. गुन्हा घडल्यानंतर त्याने अत्यंत काळजीपूर्वक फरार होण्याची योजना आखली. आधी आपल्या ओळखीतील एका मैत्रिणीशी संपर्क साधून तिला सोबत घेऊन दिल्ली गाठली. (Latest Pimpri News)
काही काळ तिथे राहिल्यानंतर तिला परत पाठविले आणि स्वतः नेपाळकडे कूच केले. त्याच्या प्रत्येक हालचाली अगदी ठरवून होत्या. पोलिसांना आपले लोकेशन सापडू नये, यासाठी त्याने कुठेही बँक व्यवहार केला नाही, एटीएम वापरले नाही, फक्त कॅश व्यवहार केले. खरेदीसाठी त्याने जाणीवपूर्वक अशा दुकानांची निवड केली जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसतात. याशिवाय त्याने नवीन सिम कार्डही खरेदी केले होते.
पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला आणि विविध क्रमांक ट्रॅक केले. पण, नीलेश इतका सावध होता की, त्याने कोणालाही थेट संपर्क केला नव्हता. त्यामुळे सुरुवातीला तपासात अडथळे येत होते. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत गुन्हे शाखेची सर्व पथके, सायबर युनिट आणि खबर्यांचे नेटवर्क सगळे कामाला लावले होते.
दरम्यान, तपास सुरू असतानाच नीलेशने पुण्यातील काही ओळखीतील व्यक्तींना ‘अॅपल फेसटाइम’ कॉल केला. त्याच्या मते, फेसटाइम कॉलवरून पोलिसांना काहीच माहिती मिळणार नाही. मात्र, याच कॉलमुळे पोलिसांचा सायबर विभाग अलर्ट झाला. त्या कॉलवरून पोलिसांनी संबंधित आयपी अॅड्रेस शोधून काढला आणि तो नेपाळमधील असल्याचे निष्पन्न झाले. या कॉलमुळे तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
पोलिस आयुक्त चौबे यांनी नेपाळमधील काही पोलिस अधिकार्यांशी आपल्या वैयक्तिक संबंधांद्वारे संपर्क साधून मदत घेतली. त्यातून एका स्थानिक चालकाचा नंबर मिळाला. त्या क्रमांकाचे विश्लेषण केल्यानंतर आणखी एक संशयित मोबाईल नंबर हाती लागला, जो नीलेशच्या नवीन सिम कार्डचा होता. त्या क्रमांकावरून पोलिसांकडे अचूक लोकेशन आले.
नेपाळमधील एका लॉजवर पोलिस पोहचले तेव्हा नीलेश झोपलेला होता. त्याच्या चेहर्यावर अजूनही पोलिस आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाहीत, हा भ्रम दिसत होता. मात्र, जेव्हा पोलिस त्याच्या समोर उभे राहिले आणि त्याची कॉलर पकडून ताब्यात घेतले, तेव्हा त्याच्या संपूर्ण नियोजनाचा फुगा फुटला. पोलिसांनी त्याला गाडीत बसवून थेट बावधन येथे आणले.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पोलिसांच्या संयमाचा, सायबर तंत्रज्ञानाचा, मानवी खबर्यांच्या जाळ्याचा आणि उच्च दर्जाच्या गुप्ततेचा संगम दिसून आला. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर अचूक नियोजन करण्यात आले.
नीलेशच्या नातेवाइकांवर, मित्रांवर आणि संपर्कातील प्रत्येक व्यक्तीवर गोपनीय देखरेख ठेवण्यात आली होती. पोलिसांना खात्री होती की, तो एखादी चूक करेल आणि त्या एका चुकीचा फायदा त्यांनी घेतला.
त्याचा डाव हाणून पाडला...
पुणे शहर पोलिस दलातील एका उच्चपदस्थ अधिकार्याच्या बहिणीशी नीलेश चव्हाणने विवाह केला होता. तसेच, पोलिस अधिकार्यांमध्ये त्याची नेहमी ऊठबस देखील होती. त्यामुळे त्याला पोलिस दलाच्या कार्यपद्धतीची चांगलीच माहिती होती. पोलिसांची चौकशी, शोध प्रक्रिया आणि तपास यंत्रणा कशी कार्य करते, हे त्याने जवळून पाहिले होते. या अनुभवाचा गैरफायदा घेत त्याने अतिशय थंड डोक्याने पलायनाची आखणी केली होती. मात्र, ‘वस्ताद एक डाव राखून ठेवतो’ या उक्तीप्रमाणे पोलिसांनी अधिक चाणाक्षपणे काम करीत त्याचा डाव हाणून पाडला आणि वेळीच त्याला अटक केली.
मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दाखवलेल्या नियोजनबद्ध कामगिरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलेपणाने माध्यमांसमोर कौतुक केले. या गौरवामुळे संपूर्ण पोलिस दलाचे मनोबल अधिक बळकट झाले आहे. याआधीही पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकांनी अनेक गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली.