

पिंपरी : पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. शहराचा झपाट्याने विकास होत असून, येथील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात येणार्या प्रत्येकाला आधार व रोजगार देत असून, येथे कोणी उपाशी राहत नाही.
मुंबईपाठोपाठ पिंपरी- चिंचवड शहर हे 'सिटी ऑफ होप' झाले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. महापालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे झाले. त्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, चोहोबाजूंनी वाढणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहरात स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रस्ते व उड्डाण पुलांमुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. मात्र, सर्वांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. शहराला योग्य व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी काम सुरू आहे. मेट्रोचे काम लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
राज्य दिवाळखोरीत निघाले, अशी विरोधक टीका करत आहेत. मात्र, राज्याचा दहा वेळा मी अर्थसंकल्प मांडला आहे. राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती चांगली आहे. देशात सर्वात जास्त जीएसटी महाराष्ट्राला मिळतो. कोणत्याही योजना बंद करण्यात येणार नाहीत, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागील जागेत माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम हाती घ्या, अशी सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांनी केली. ती जागा पीएमपीएलची असून, त्यांना तशा सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.