

देहूगाव : नमामी चंद्रभागाअंतर्गत इंद्रायणी नदीघाट विकास करण्यासाठी जागा संपादित करण्यास देहगाव नगरपंचायतीच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे इंद्रायणी नदीघाट परिसर विकसित होणार असून, भाविकांनाही चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
देहगाव नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ४२ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यात देहू नगरपंचायत हद्दीत मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा विषय वगळता अन्य ४१ विषयांना मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्ष पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली देहू नगरपंचायत कार्यालयात सर्वसाधारण सभा पार पडली. सभेस मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांसह इतर विभागाचे अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
वार्ड क्रमांक नऊमधील विविध सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी एच. डी. बी. पाईपलाईन टाकणे, एमएससीबीला सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देणे व जलशुद्धीकरण केंद्राला स्वतंत्र केबल टाकणे,
सर्वे नंबर ९७ मध्ये मुलांसाठी ओपन जिमचे साहित्य देणे, वार्ड क्रमांक सतरामध्ये मुख्य रस्त्यापासून टिळेकर यांच्या घरापर्यंत सिमेंटचा रस्ता करणे, याच वार्डमधील श्रीकृष्ण मंदिरासमोरील नगरपंचायतीची जागा ताब्यात घेऊन त्या जागेत पाण्याची टाकी बांधणे, सिमेंटच्या रस्त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक टाकणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे.
२०२० पूर्वीच्या अनधिकृत बांधकामे व भूखंड यांना मुदतवाढ देणे, गायरानातील घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेस कुंपण करणे व त्याच ठिकाणी टपरी तयार करणे, जुना ट्रॅक्टर दुरुस्त करणे आणि दोन टॅक्टरसाठी दोन ट्रॉल्या खरेदी करणे, इंद्रायणी नदीपात्रात अस्थी विसर्जन करणे बंद करणे,
नवीन प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल व इंटेकवेलसाठी देहूगाव सर्वे क्रमांक १४ मधील जागा संपादित करणे, नमामी चंद्रभागा अंतर्गत इंद्रायणी नदीघाट विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, वार्ड क्रमांक दोनमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, वार्ड क्रमांक पाचमध्ये शुभारंभ पार्क सोसायटीमध्ये अंतर्गत रस्ते, भूमिगत केबल टाकणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
देह नगरपंचायत हद्दीत वार्ड क्रमांक अकरामध्ये भरणारा शुक्रवार आणि मंगळवरचा आठवडे बाजार बंद करावा, अशी मागणी नगरसेविका पौर्णिमा परदेशी यांनी पत्राद्वारे केली होती. परंतु, आठवडे बाजार बंद न करता तो सायंकाळी साडेसात वाजता बंद करावा,
जेणे करून त्यानंतर देहू नगरपंचायतीकडून स्वच्छता केली जाईल. तसेच. या भागातील रहिवासीयांना कसलाही त्रास होणार नाही. जर त्यानंतर एखादा भाजी विक्रेता भाजी विकताना दिसून आला तर दंड वसूल करण्यास मंजुरी मिळाली आहे.