

पिंपरी : देहूरोड येथील थॉमस कॉलनीजवळील जंगल परिसरात पहाटे एका १६ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. प्रेमसंबंधातील वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती असून, हल्ल्यात मृत तरुणाचा चुलत भाऊही गंभीर जखमी झाला आहे.
दिलीप मोरिया (वय १६) याचा खून झाला असून, त्याचा चुलत भाऊ अरुण मोरिया (वय १४) हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. याप्रकरणात सनी सिंग (रा. शिवान, जिल्हा बिहार) याच्या विरोधात देहूरोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिलीप मोरिया याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्याच मुलीची सनी सिंग याच्यासोबतही जवळीक होती. या वादातून तीन महिन्यांपूर्वी दिलीप आणि सनी यांच्यात वाद झाला होता.
दरम्यान, बुधवारी (दि. ११) रात्री दिलीप मोरियाने चुलत भाऊ अरुण मोरियाला फोन करून थॉमस कॉलनीजवळील जंगल परिसरात बोलावले. तेथे दिलीप आणि सनी यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी अरुण मध्ये पडला असता, सनीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
जखमी अवस्थेत अरुणने थॉमस कॉलनीकडे धाव घेतली. त्याने मित्रांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर अरुणला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, घटनास्थळी कोणीही सापडले नाही.
रात्रभर शोध घेतल्यानंतर पहाटे सव्वा पाचच्या सुमारास पुणे–मुंबई महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडच्या खालील जंगल भागात दिलीप मोरियाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर चाकूचे गंभीर वार असल्याचे निदर्शनास आले. प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी सनी सिंगने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी सनी सिंगविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.