

मोशी: तीन वर्षांपूर्वी मोशीकरांसाठी नवीन पोस्ट कार्यालय आणि नवीन पिनकोड सुरू करण्यात आला. मात्र, तीन वर्षांनंतरही नवीन पिनकोड कार्यान्वित नसल्याने विद्यार्थ्यांना, नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक, पालक यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोशीकरांना नवीन पोस्ट ऑफिस आणि पिनकोड (411070) मिळाला. मात्र, पिनकोड कार्यान्वित नसल्यामुळे मोशीकरांना पुन्हा अडचणी येत आहेत. पिनकोड कार्यान्वित नसल्यामुळे महाविद्यालयीन मुला-मुलींना प्रवेशप्रक्रियेसाठी अडचणी येत आहेत. ऑनलाईन खरेदी-विक्री करताना नवीन पिनकोड येत नाही. (Latest Pimpri News)
ऑनलाईन खरेदी केल्यानंतर जुना पिनकोड वापरावा लागतो. त्यामुळे वस्तू आळंदी पोस्ट ऑफिसला जाऊन मोशीला येते. त्यामध्ये बराच वेळ जातो. एलआयसी पॉलिसी, हेल्थ पॉलिसी आणि इतर पॉलिसी यांच्याकडे हा पिनकोड अस्तित्वात नाही, असे दाखविले जाते. त्यामुळे आळंदीचा जुनाच पिनकोड वापरावा लागत आहे.
नवीन पोस्ट ऑफिस, पिनकोड दिला मात्र कार्यान्वित नसल्याने जुनाच पिनकोड आळंदी पोस्ट ऑफिसचा वापरावा लागतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अॅडमिशन घेताना, पॉलिसीच्या ठिकाणी नवीन पिनकोड अस्तित्वात नसल्याचे सांगितले जाते. नाईलाजाने जुना पिनकोड वापरावा लागतो.
- संतोष बोराटे, सामाजिक कार्यकर्ते.
नागरिकांना जुनाच पिनकोड वापरावा लागत आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून सुरू केलेल्या पिनकोडचा काहीच उपयोग होत नाही. नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे हा पिनकोड कार्यान्वित करावा.
- रूपाली आल्हाट, सामाजिक कार्यकर्त्या.
पिनकोड कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारच्या हातात असते. पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही फक्त शासनाकडून आलेल्या सुविधा देण्याचे काम करतो. नवीन पिन अजूनही कार्यान्वित नसल्याने तक्रारी येत आहेत.
- सारिका नलावडे, पोस्ट ऑफिस