Moshi Accident : नियतीचा क्रूर खेळ... 'जेवायला बसलोय' हा भावेश यांचा मेसेज ठरला शेवटचा, दीड वर्षांचा संसार क्षणार्धात उद्ध्वस्त

वृद्ध आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत मुलाची अंत्ययात्रा; संपूर्ण परिसर हळहळला
Moshi Accident : नियतीचा क्रूर खेळ... 'जेवायला बसलोय' हा भावेश यांचा मेसेज ठरला शेवटचा, दीड वर्षांचा संसार क्षणार्धात उद्ध्वस्त
Published on
Updated on

पिंपरी-चिंचवड/जळगाव : मोशी कचरा डेपो येथे बुधवारी (दि. ९ जुलै) रोजी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत शिरसोली प्र.न. (ता. जि. जळगाव) येथील मूळ रहिवासी आणि निगडी (रुपीनगर) येथे स्थायिक असलेले भावेश मोहन वाणी (वय ३४) यांचे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, एका हसत-खेळत असलेल्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला गेला आहे.

नियतीचा क्रूर खेळ असा की, ज्या दिवशी भावेश यांनी आपल्या जगाचा निरोप घेतला, त्या दिवशी दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी त्यांनी आपल्या पत्नीला 'जेवायला बसलो आहे' असा एक साध्या शब्दांतील मेसेज केला होता. कोणालाही कल्पना नव्हती की, पत्नीच्या फोनवर आलेला हा संदेश भावेश यांचा शेवटचा संवाद ठरेल. याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास मोशी येथील 'वेस्ट-टू-एनर्जी' प्रकल्पाची तीन मजली प्रशासकीय इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळली आणि क्षणार्धात जमीनदोस्त झाली. या ढिगाऱ्याखाली २० कामगार अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, एनडीआरएफ आणि भारतीय सैन्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले होते.

Moshi Accident : नियतीचा क्रूर खेळ... 'जेवायला बसलोय' हा भावेश यांचा मेसेज ठरला शेवटचा, दीड वर्षांचा संसार क्षणार्धात उद्ध्वस्त
Moshi Accident: मोशी दुर्घटनेत नागेश गायकवाड बेपत्ता; दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंबाची नजर ढिगाऱ्याकडे

भावेश हे मोहन वाणी यांचे एकुलते एक पुत्र होते आणि पाच वर्षांपूर्वी बहीण गमावलेल्या या कुटुंबासाठी तेच जगण्याचे एकमेव आधार होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत वडिलांनी घरोघरी जाऊन पापड आणि पाव विकून भावेशला लहानाचा मोठा केला होता, तर शिक्षणात हुशार असलेल्या भावेशने आपल्या कष्टाने स्वतःचे स्थान निर्माण केले होते. वृद्ध आई-वडिलांना सुखाचे दिवस दाखवण्याचे स्वप्न पाहणारा भावेश निगडी येथे पत्नीसह वास्तव्यास होता आणि अवघ्या दीड वर्षांपूर्वीच त्यांनी आपला संसार थाटला होता.

Moshi Accident : नियतीचा क्रूर खेळ... 'जेवायला बसलोय' हा भावेश यांचा मेसेज ठरला शेवटचा, दीड वर्षांचा संसार क्षणार्धात उद्ध्वस्त
Moshi Accident: मोशी दुर्घटनेला २४ तास उलटले; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सनी माने यांचा अद्याप शोध नाही, पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश

ज्या मुलाला लहानाचे मोठे करताना वडिलांच्या हाताला फोड आले आणि ज्याच्या भविष्यासाठी आई-वडिलांनी आयुष्य वेचले, त्याच मुलाची अंत्ययात्रा पाहण्याची दुर्दैवी वेळ आज त्यांच्यावर आली आहे. ही वेदना शब्दांच्या पलीकडची असून, शिरसोलीच्या या सुपुत्राच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ईश्वर भावेश यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि या अस्मानी संकटात सापडलेल्या वाणी कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news