

Pimpri firing incident
पिंपरी: पिंपरी येथे भरवस्तीत गोळीबार करून दुकानदाराला गंभीर जखमी करणारा आरोपी कुख्यात रवी पुजारी टोळीचा शूटर असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. यापूर्वी त्याने सहा वेळा गोळीबार केला असून बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्याचा त्याचा गुन्हेगारी पॅटर्न आहे. चिंचवड परिसरातून मोटारसायकल चोरी करून त्याने पिंपरीत येथे गुन्हा केला होता.
पैशाची चणचण भासल्याने त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. रविंद्र भाऊसाहेब घारे (४०, रा. ताम्हाणे वस्ती, टॉवर लाईन, चिखली, मुळगाव ओझर्डे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Latest Pimpri News)
घटनेचा तपशील
दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेला आरोपी “दस वाला फ्रुटी दे” असे म्हणत पिंपरी येथील दुकानात घुसला. व्यापारी तरुण फ्रिजमधून फ्रुटी देत असताना त्याने गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. चैन न तुटल्याने आरोपीने पिस्तूल दाखवत धमकावले आणि पुन्हा ओढली. अर्धी चैन मिळाल्यानंतर उर्वरित मिळवण्यासाठी त्याने पिस्तूलने तरुणाच्या डाव्या मांडीवर गोळी झाडली.
पोलिसांची दहा पथके होती मागावर
गुन्ह्याच्या गांभीर्याचा विचार करून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी १० पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ७०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
आरोपीने हेल्मेट, रेनकोट तसेच मोबाईल न वापरता पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही शरीरयष्टीवरून ओळख पटवत ६ ऑगस्ट रोजी चिखली येथून आरोपीला अटक करण्यात आली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
आरोपी घारे हा रवी पुजारी व सुरेश पुजारी टोळीचा सदस्य असून सुपारी घेऊन खंडणी, खून, जबरी चोरी करणारा शार्पशूटर आहे. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो फरार होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, वाहनचोरी व गोळीबार असे २५ गंभीर गुन्हे नोंद आहेत.
पिस्तुल, काडतुसे, मोटारसायकल जप्त
अटकेनंतर पोलिसांनी त्याच्याकडून १० ग्रॅम सोन्याची चैन, एक देशी पिस्तूल, ११ जिवंत काडतुसे, दोन मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे चिंचवड, एमआयडीसी भोसरी व वडगाव मावळ येथील वाहनचोरीचे आणखी तीन गुन्हे उघड झाले आहेत.
उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दतात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर आणि पथकातील पोलीस अंमलदारांनी केली. त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.