

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोची संपूर्ण जबाबदारी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालविणार्या ठाणे येथील अॅन्टोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. या कंपनीची आहे. त्या कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळेच तेथील नियमापेक्षा अधिक उंचीच्या कचर्याचा डोंगर कोसळला. त्या दुर्घटनेत नाहक तब्बल 9 कर्मचार्यांचे बळी जाऊन, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. परिणामी, त्या दुर्घटनेत ठेकेदार कंपनीच जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेचा एकूण 81 एकर जागेत मोशी कचरा डेपो आहे. तेथे दररोज 700 टन सुका कचरा जाळून वीज निर्मितीचा प्रकल्प डीबीओटी तत्वावर जुलै 2023 पासून सुरू झाला आहे. त्यापासून 14 मेगा वॅट वीज तयार केली जात आहे. त्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 ला झाले. त्या प्रकल्पास महापालिकास सर्वसाधारण सभेने 20 एप्रिल 2018 ला मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्प बांधकामासाठी 18 महिने कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर 21 वर्षांसाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प संबंधित ठेकेदार कंपनीच्या ताब्यात देण्यात आला. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, एक हजार टन क्षमतेचा मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) जबाबदारी कंपनीवर आहे. तसेच, मोशी कचरा डेपोत अस्तित्वातील सॅनिटरी लॅण्डफिल्ड (कचर्याचे डोंगर) साईटची देखभाल व दुरूस्ती करून, आवश्यकतेनुसार त्याचे क्लोजर व नवीन सॅनिटरी लॅण्डफिल्ड तयार करणे कंपनीवर बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे डेपोत निर्माण झालेल्या कचर्याच्या डोंगराची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी त्या कंपनीस नोटीसही बजावली आहे. सॅनिटरी लॅण्डफिल्डचे सुरक्षित व्यवस्थापन, ढिगार्याची स्थिरता, स्ट्रॉम वॉटर व्यवस्थापन, रिस्क अॅनिलिसिस, नियमित निरीक्षण, धोक्यांचे मूल्यांकन व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे ठेकेदार कंपनीचे हलगर्जीपणा झाला आहे. या प्रकरणी संभाव्य धोक्याबाबत पूर्वसूचना, तक्रारी किंवा इशारे प्राप्त करून घेण्याची जबाबदारी असताना आवश्यक ती तातडीची प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली नाही. कंपनीच्या यंत्रणेवर प्रभावी देखरेख न ठेवणे ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून, कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध होत आहे. करारनाम्यातील सर्व तांत्रिक, सुरक्षा व पर्यावरणीय अटीचे पालन ठेकेदार कंपनीने केले नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे आयुक्तांनी नोटीशीमध्ये नमूद केले आहे. डेपोतील नियमापेक्षा अधिक उंचीचे म्हणजे 30 ते 35 मीटर उंच कचर्याचे डोंगर उभे करण्यात आले. त्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्या दुर्घटनेस ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोणत्याही कारणाने कंपनीकडून काम काढून घेण्याची अट
प्रकल्पासाठी सर्व आवश्यक परवनाग्या घेण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. प्रकल्पासाठी मोशी कचरा डेपोतील आवश्यक जागा 21 वर्षे कालावधीसाठी दैनंदिन गोळा होणारा कचरा प्रक्रियेसाठी भाडे तत्वावर देण्यात आली आहे. भाडेपोटी ठेकेदार कंपनी प्रति एकर प्रतिवर्ष 1 रुपया शुल्क आहे. वेस्ट टू एजर्नी प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या मोशी कचरा डेपोतील जागा जशी आहे तशी संबंधित ठेकेदारला हस्तांतरीत केली जाईल. यानंतर संपूर्ण प्रकल्प कालावधीमध्ये या जागेची सुरक्षितेची जबाबदारी कंपनीची राहील. महापालिकेच्या परवानगीशिवाय ती जागा प्रकल्पाव्यतिरिक्त कोणत्याही इतर कारणासाठी वापरता येणार नाही. प्रकल्प कालावधी संपल्यानंतर किंवा दरम्यानच्या काळात करारनामा कोणत्याही कारणाने किंवा प्रकरण 10 व 35 मधील नमूद अटी व शर्तीचा भंग केल्यास प्रकल्पाची जागा वापरण्याची परवानगी कोणतेही कारण न देता आपोआप रद्द होईल. यानंतर प्रकरण 30 मधील तरतुदीनुसार दुसर्या कंपनीशी करारनामा केल्यास सर्व प्रकल्प जसा आहे तसा व प्रकल्पाचे सर्व हक्क त्या कंपनीस हस्तांतरीत करण्यात येतील, अश्या अटी व शर्ती महापालिका व अॅन्टोनी लारा रिन्युएबल एजर्नी प्रा. लि. या कंपनीमध्ये झालेल्या करारमान्यात आहेत.
तीन वर्षांत प्रकल्पाची क्षमता वाढवली नाही
पिंपरी-चिंचवड शहरातून गोळा होणार्या कचर्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन 21 वर्षे कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार प्रकल्पाची क्षमता वाढविण्यचाी जबाबदारी महापालिकेने ठेकेदारावर टाकली आहे. तसा स्पष्ट उल्लेख करारनाम्यात आहे. मात्र, गेल्या तीनपेक्षा अधिक वर्षात ठेकेदार कंपनीने 14 मेगा वॅटपेक्षा अधिक वीज निर्मिती केलेली नाही. तसेच, दररोज केवळ 700 टन सुका कचरा जाळला जात आहे.
मोशी डेपोतील कचर्याचीही जबाबदारी त्या ठेकेदाराचीच
मोशी कचरा डेपोची संपूर्ण जबाबदारी वेस्ट टू एजर्नी प्रकल्प चालविणार्या अॅन्टोनी लारा रिन्युएबल एजर्नी प्रा. लि. या ठेकेदार कंपनीची आहे. त्या कंपनीची परवानगी घेतल्याशिवाय तेथे कोणाला प्रवेश दिला जात नाही. त्याबाबत करारनाम्यात स्पष्ट उल्लेख आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाशेजारच्या कचरा आणि कचर्याच्या डोंगराची जबाबदारी त्या कंपनीकडेच आहे, असे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता सोहन निकम यांनी सांगितले.