

मोशी: मागील पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मात्र, राडारोड्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परिणामी पावसामुळे राडारोडा कुजून उग्र वास येत आहे. काही ठिकाणी पाणी साचत आहे. यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे येथील राडारोडा साफ करणे गरजेचे आहे.
डासांची वाढती पैदास, धूळ, जलप्रदूषण या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. तत्काळ राडारोडा उचलण्यासाठी महापालिकेने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात कुदळवाडीत मोठी अतिक्रमण कारवाई झाली. शहरातील मोठ्या प्रमाणातील भंगार व्यावसायिक या परिसरात होते. (Latest Pimpri News)
झाल्यानंतर सर्व राडारोडा जागीच अस्ताव्यस्त पडलेला आहे. कारवाईनंतर राडारोडा उचलण्यासाठी महापालिकेने जागा मालकांशी चर्चा करून नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही राडारोडा जैसे थे असल्याने पावसाळ्यात डासांची पैदास, जलप्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्य समस्या वाढल्या आहेत.
महापालिकेने अतिक्रमण कारवाई केली. त्यानुसार, राडारोडा उचलण्यासाठीही पुढाकार घ्यावा. ज्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या येणार नाहीत. राडारोड्यामुळे डासांची पैदास वाढते. त्यातून आरोग्याच्या समस्या वाढल्या जातात.
- अश्विनी जाधव, स्थानिक
पोटाचे विकार, कॉलरा, दूषित पाण्यामुळे विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत. तसेच राडारोड्यामुळे डासांची पैदास वाढून आरोग्य समस्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने पुढाकार घेऊन राडारोडा उचलावा.
- दिनेश यादव, स्थानिक
कुदळवाडीमध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने हे काम थांबलेले आहे. उर्वरीत ठिकाणचा राडारोडा उचलण्यासाठी जागा मालकांशी महापालिकेचे बोलने सुरू आहे.
- मकरंद निकम, शहर अभियंता