

पिंपरी: सर्वच क्षेत्रात रोखीच्या व्यवहाराऐवजी कॅशलेस अर्थात ऑनलाईनद्वारे व्यवहार करण्यास प्राधान्य दिले जात आहे; मात्र पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालये, दवाखान्यांत कॅशलेस व्यवहाराचा पर्याय प्रशासनाकडून दिला जात नाही.
केसपेपर, उपचार बिलाची रक्कम जमा करताना रोख पैसे नसल्यास रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. पेपरलेस आणि स्मार्ट कारभाराचा दावा करणारे महापालिका प्रशासन रुग्णालयांत कॅशलेस बिलिंग कधी सुरू करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Pimpri News)
महापालिकेत एक एप्रिलपासून पेपरलेस कारभार सुरू झाला आहे. यापुढे प्रशासनात फाईल किंवा प्रस्ताव कागदोपत्री न स्वीकारण्याची भूमिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतली. वारंवार अडथळे येत असले, तरी संपूर्ण कारभार ई-प्रणालीवरून सुरू असल्याचा दावा प्रशासनाचा आहे.
परंतु, दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालये, दवाखान्यांमध्ये डिजिटल व्यवहार सुरू करणे प्रशासनाला जमलेले नाही. शहरातील नागरिकांसाठी महापालिकेची आठ मोठी रुग्णालये, 30 दवाखान्यांसह काही वैद्यकीय सुविधा अल्पदरात उपलब्ध आहेत. या रुग्णालय आणि दवाखान्यांमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार होतात.
मात्र, महापालिकेच्या सर्व रुग्णालयात रुग्णांच्या उपचारांचे पैसे ऑनलाईन स्वीकारण्याची व कॅशलेस व्यवहाराची सुविधा नाही. त्यामुळे अनेकवेळा रुग्णांकडे रोख पैसे नसल्याने वादावादीचे प्रसंग घडता. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून कॅशलेस आणि डिजिटल व्यवहार सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर, रुग्णालयात कॅशलेस व्यवहार सुरू करण्यावर चर्चा होते. परंतु, निर्णयाअभावी अनेक वर्षे हा प्रस्ताव प्रलंबित आहे.
रोखीच्या व्यवहारामुळे गैरप्रकारास प्रोत्साहन
महापालिकेच्या रुग्णालयातील या रोखीच्या व्यवहारामुळे गैरप्रकार घडतात. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातच दोन वेळा रोखीच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचे समोर आलेले आहे. या प्रकरणांत कर्मचार्यांवर कारवाई झाली. मात्र, अशा प्रकारानंतरही महापालिका वैद्यकीय विभागाने सुधारणा केलेली नाही. कॅशलेस व्यवहार सुरु केल्यास काही प्रमाणात रोख रकमेची हाताळणी कमी होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होऊ शकते.
कॅशलेस व्यवहाराबाबतचा नर्णय प्रलंबित
महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यांमध्ये डिजिटल व्यवहार सुरू करण्यासाठी वैद्यकीय विभाग प्रयत्नशील आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आर्थिक व महापालिकेच्या व्यवहाराशी संबंधित बाब असल्याने ही व्यवहार प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. परंतु, तरीदेखील लेखा व इतर संबंधित विभागांसोबत चर्चा सुरू आहे. अद्याप कॅशलेस व्यवहार सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही, असे महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.