Pimpri Crime: कबड्डीपटू तरुणीवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी: कबड्डीपटू युवतीवर अत्याचारप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना जेरबंद केले. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.
अंकुश भेंडेकर (24), शिवाजी वाबळे (55), रमेश गांगर्डे (26) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. (Latest Pimpri News)
यातील शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे हे दोघेही क्रीडा प्रशिक्षक असून दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर अंकुश भेंडेकर हा जामिनावर आहे. पीडित 17 वर्षीय युवतीच्या मामाने याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात 26 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 17 वर्षीय युवती राष्ट्रीय कबड्डीपटू आहे. तिला चांगले प्रशिक्षण मिळावे, यासाठी भोसरी येथील संस्थेत सराव सुरू केला. त्यासाठी वाकड येथे तिच्या मामाकडे ती रहायला आली होती.
दरम्यान, 25 फेब्रुवारी रोजी ती घरी न परतल्याने तिच्या मामाने वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण झाल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात 26 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलिसांनी याप्रकरणी अंकुश याला अटक केली.
दरम्यान, आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित 17 वर्षीय युवतीने सांगितले. त्यानुसार, वाकड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आली. मअॅट्रॉसिटीफ आणि बाललैंगिक अत्याचार प्रकरणी कलम वाढ झाली. त्यानंतर वाकडचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांनी संशयित शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे यांना अटक केली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची तत्परता
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच या गंभीर गुन्ह्याचा योग्य दिशेने तपास करून पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी यापूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. मात्र, नव्याने कलम वाढ केल्यानंतर गुन्ह्यातील तपासाबाबतचे पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहेत.
काय आहे प्रकरण...
पीडित अल्पवयीन युवतीला संशयित क्रीडा प्रशिक्षकाने कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून तिला नेवासे येथे नेले. तेथून पुढे नेऊन एका हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. तिला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. नंतर शिवाजी वाबळेने तिला भोपाळला नेले. तिथेही अत्याचार केला.
पुढे श्रीलंकेतील उर्वरित स्पर्धेसाठी प्रायव्हेट अकॅडमी जॉईन करावी लागेल, असे सांगितले. हा प्रकार 28 ते 31 जानेवारी या कालावधीत घडला. दरम्यान, संशयित अंकुश भेंडेकर याने 25 फेब्रुवारी रोजी पीडित युवतीला पुण्यातून पैठण त्यानंतर राहुरी येथे नेले. अपहरणप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना वाकड पोलिसांनी याप्रकरणी नेवासा येथून भेंडेकर याला अटक केली.

