

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी 30 जूनपूर्वी मालमत्ताकर भरून विविध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या करसंकलन विभागाने केले आहे. नागरिकांनी ऑनलाइन मालमत्ताकर भरल्यास त्यांना थेट सामान्यकरात 10 टक्के सवलत दिली जाते.
76,688 मालमत्ताधारांकडे 498 कोटींची थकबाकी
महिलांच्या नावावर नोंद असलेल्या मालमत्तांवर 30 टक्क्यांपर्यंत सवलत आहे. पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्या हाऊसिंग सोसायटी, संस्था, दिव्यांग व्यक्तींच्या नावावर असलेल्या मालमत्ता, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना सामान्यकरात सवलत दिली जाते. (Latest Pimpri News)
दरम्यान, 10 हजार रुपयांपुढील सुमारे 76 हजार 688 मालमत्ताधारांकडे 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार मालमत्ताधारकांना महापालिकेच्या वतीने थकबाकी बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठविण्यात आली आहे. वेळेवर कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन माध्यमातून190 कोटींचा कर भरणा
आतापर्यंत ऑनलाईन माध्यमातून मालमत्ताकर भरणार्या सुमारे 1 लाख 89 हजार 823 नागरिकांनी 10 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. केवळ ऑनलाईन व्यवहारांमधूनच 189 कोटी 52 लाख रुपये जमा झाले आहेत. ऑनलाइन कर भरणा प्रणालीला प्रतिसाद वाढत आहे.
बिल भरून सलवतीचा लाभ घ्यावा
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा उभारणी, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या क्षेत्रात महापालिका सातत्याने काम करत आहे. यासाठी आवश्यक निधीचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे मालमत्ताकर. नागरिकांनी वेळेत कर भरून महापालिकेच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे. तीस जूनपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.
थकीत मालमत्ताकर न भरल्यास जप्ती कारवाई
ऑनलाईन माध्यमातून कर भरल्यास 10 टक्के सवलत, तसेच महिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना 30 टक्क्यांपर्यंत सवलत योजना आहे. थकीत कर न भरल्यास मात्र नियमानुसार जप्तीची कारवाई होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.