

चऱ्होली: पुणे-आळंदी रस्ता हा पालखी मार्ग म्हणून ओळखला जातो. पुण्यनगरी आणि अलंकापुरी या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता असा या पालखी मार्गाचा लौकिक आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीनुसार काही काळापासून या पालखी मार्गावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे चांगला लौकिक असणाऱ्या या मार्गाची बदनामी होत आहे.
पुणे-आळंदी पालखी मार्गावर टाटा कन्सल्टन्सी कंपनीपासून दिघीपर्यंतच्या रस्त्यावर पुण्याकडून आळंदीकडे येताना डाव्या हाताला जो दाट झाडीचा सलग पट्टा आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथीयांकडून देहविक्रीचा धंदा गेली कित्येक दिवसांपासून सुरू आहे. संध्याकाळी सात वाजतानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथीयांची गर्दी झालेली दिसून येते. (Latest Pimpari chinchwad News)
तोकड्या कपड्यातले विविध अंगविक्षेप करणारे तृतीयपंथी झाडाच्या आडोशाने उभे असतात. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेपासूनच संपूर्ण अंधार असतो. ना रोडलाईट आहेत ना कुठल्याही प्रकारची सुरक्षितता आहे.
पुढे मॅक्झिन चौकापासून थोडे पुढे आल्यानंतर मोझे कॉलेजच्या शेजारच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर तरुणी चेहरे बांधून उभे असतात. म्हणजे विश्रांतवाडीची हद्द ओलांडल्यानंतर कळसपासून अगदी थेट आळंदीपर्यंत टप्प्याटप्प्यांवर अवैध धंदे चालू असलेले निदर्शनास येते.
धाकट्या पादुका मंदिरापासून पुढे आल्यावर देहू फाटा ओलांडल्यानंतर ज्या ठिकाणी वाय जंक्शन आहे, त्या वाय जंक्शन मार्गे डाव्या हाताने आळंदीकडे येताना एसटी स्टँडच्या परिसरात सर्वत्र मोकळी जागा आणि अंधार असल्यामुळे या अवैध धंद्यांना पोषक वातावरण मिळत आहे. पुढे अगदी चाकण चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणी चेहरे बांधून बिनधास्त उभा असतात.
याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाल्यानंतर किंवा महिला संघटनांकडून निषेध नोंदविल्यानंतर तात्पुरती कारवाई केली जाते. पण दोन-चार दिवसांतच पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. या रस्त्यांवरून रोज किती तरी महिला मुलींना प्रवास करावा लागतो. या असुरक्षित आणि लाजिरवाण्या वातावरणामुळे महिला मुलींच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. हे सर्व कुठेतरी थांबले पाहिजे.
आळंदीच्या पावित्र्याला धक्का
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे आळंदीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात मोठे महत्त्वाचे स्थान आहे. आळंदीत ज्ञानदान करणाऱ्या कितीतरी वारकरी शिक्षण संस्था आहेत. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे वेदभवन आणि चाकण चौकातील श्री स्वामींचा मठ महाराष्ट्रातील कितीतरी भाविकांसाठी श्रद्धेय आहेत. या ज्ञानवंतांच्या मांदियाळीत अशा पद्धतीचे अवैध धंदे शोभा देतात का?
पुणे-आळंदी पालखी मार्गावर थोरल्या पादुका मंदिर आणि साईबाबा मंदिर आहे. आजूबाजूला नागरी वसाहत आहे. या अशा पद्धतीने जे अवैध धंदे खुलेआम रस्त्यावर चालू आहेत, त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम समोर येत आहेत. प्रशासनाने हे सर्व अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावेत.
- हभप प्रसाद महाराज माटे, कीर्तनकार, आळंदी देवाची.
रस्त्यावर उभा राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुली, महिलांवर प्रशासनाने कारवाई करून दंडित करण्याची गरज आहे. जर हे काम प्रशासनाकडून होत नसेल, तर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने जनआंदोलन उभे करून चऱ्होलीतील तरुणांना हे काम लवकरच हाती घ्यावे लागेल.
- ॲड. कुणाल तापकीर, सामाजिक कार्यकर्ते, चऱ्होली.