

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार 19 सेवासुविधा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्या आहे. आठवड्याभरात यात 10 नवीन सेवांची भर पडणार असून नागरिकांना पीएमआरडीएमधील एकूण 29 सेवांचा लाभ ऑनलाईन घेता येणार आहे.
शासनाच्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान आणि विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलात आला आहे. शासनाने 150 दिवसांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन शासकीय सेवा सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने पीएमआरडीएच्या माध्यमातून 19 सेवा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Latest Pimpari chinchwad News)
पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन प्रणालीत अर्जदार नागरिकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्ज प्राप्त झाल्याचा संदेश मिळणार आहे. या सेवा सुविधांचा लाभ नागरिकांना घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
...या आहेत सेवा
पीएमआरडीए क्षेत्रात अभिन्यासमारत बांधकाम परवानगी, जोता मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा, नकाशा देणे, सुधारित बांधकाम परवानगी, तात्पुरते रेखांकन परवानगी, सुधारित तात्पुरते रेखांकन, अंतिम रेखांकन परवानगी, नूतनीकरण परवानगी, भागश: भोगवटा प्रमाणपत्र, साईट एलेवेशन प्रमाणपत्र, वाटप भूखंडाचे / गृहयोजनेतील सदनिकांचे हस्तातंरण, त्याची वारसानोंद आणि ना- हरकत प्रमाणपत्र, प्राथमिक व अंतिम अग्निशमन ना-हरकत दाखला, पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्र.