

संतोष शिंदे
पिंपरी: महाळुंगेतील तरुण गजानन बोळकेकर यांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये अवजड वाहनांमुळे निर्माण झालेली अपघातांची गंभीर समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
भरधाव ट्रक, डंपर, मिक्सर आणि कंटेनरमुळे सामान्य नागरिकांच्या जीवितास कायमचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी मागील सहा महिन्यांत 50,714 वाहनांवर कारवाई करत तब्बल 6 कोटी 57 लाखांपेक्षा अधिक दंड आकारला आहे. (Latest Pimpri News)
उपायांची गरज
वजड वाहनांना ठरावीक वेळेत (वर्दळ असताना) शहरात प्रवेशबंदी करावी
औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ते तयार करावेत
रस्ते सुरक्षा झोनमध्ये पोलिसांची अधिक गस्त वाढवावी
चालकांची वैद्यकीय व मानसशास्त्रीय चाचणी नियमित घ्यावी
जागोजागी सीसीटीव्ही व वाहन ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित करावी
हिंजवडीतही तरुणींनी गमावला जीव
महाळुंगे परिसरात रविवारी (दि. 14) सकाळी भरधाव कंटेनरने दुचाकीवरील गजानन बोळकेकर (26, मूळ रा. कंधार, जि. नांदेड) यांना चिरडले. त्यांच्या मृत्यूमुळे संतापाचे वातावरण असून, शहरातील औद्योगिक भागात मागील काही महिन्यांत अशाच प्रकारे अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत. जानेवारी महिन्यात दोन तरुणी मिक्सरखाली चिरडल्या होत्या. या सर्व अपघातांमागे बेशिस्तपणा हे एकच कारण ठळकपणे समोर आले आहे.
बेशिस्त चालकांमुळे अपघात
शहरात सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. मात्र, या नियमांकडे चालक दुर्लक्ष करत आहेत. चाकण, तळवडे, हिंजवडी, महाळुंगे यांसारख्या औद्योगिक भागात दिवसाढवळ्या ट्रक, डंपर, मिक्सर व कंटेनर धावत असतात. वाहतूक पोलिसांची नजर चुकवत हे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असून, त्याचे भीषण परिणाम अपघाताच्या स्वरूपात दिसून येत आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत कारवाई वाढली
वाहतूक विभागाने सन 2024 मध्ये 37 हजार अवजड वाहनांवर कारवाई करून 4 कोटी 23 लाखांचा दंड वसूल केला होता. यंदा वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 50,714 वाहनांवर कारवाई करत तब्बल 6 कोटी 57 लाखांपेक्षा अधिक दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे यंदा वाहतूक पोलिसांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे अधोरेखित होत आहे.
औद्योगिक परिसर ठरतोय अपघातांचे केंद्र?
एमआयडीसी आणि अन्य औद्योगिक संकुलांमुळे अवजड वाहनांची गरज नाकारता येणार नाही. मात्र, त्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करणे, नियोजनबद्ध वेळांची अंमलबजावणी करणे आणि आणखी कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अपघातांचा आकडा आणि मृतांची वाढती संख्या पाहता, औद्योगिक विकासाबरोबर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारीही दुर्लक्षित करता येणार नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.