

पिंपळे निलख: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील कचरा रस्त्यात, पदपथावर व मध्यवर्ती ठिकाणी टाकू नये, शहर स्वच्छ सुंदर दिसावे यासाठी कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना इंदौरच्या धर्तीवर राबविण्यात आली.
या संकल्पनेमुळे शहरातील कचराकुंडी तर गायब झाली; परंतु कचरा मात्र शहरवासीयांची पाठ सोडताना दिसून येत नाही. महापालिका हद्दीतील पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. परंतु, या स्मार्ट सिटीच्या प्रवेशद्वारावरच कचर्याचे साम्राज्य आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचत असून, प्रशासनाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Pimpri News)
पिंपळे निलख येथील दत्त मंदिर, उद्यान, बसस्टॉप व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले विरंगुळा केंद्राच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी रस्त्यावरील कचरा गोळा करून येथेच टाकतात. यामुळे परिसरात नागरिकदेखील सकाळच्या वेळेत कामावर जाताना घरातील कचरा या परिसरात आणून टाकत आहेत.
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रीन मार्शल, भरारी पथकांची नियुक्ती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे; परंतु ते नेमके काम कुठे करतात आणि कधी करतात, हाच प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. घंटागाडी वेळेवर तो कचरा उचलत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. यामुळे या भागात कचरा टाकणार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पीएमपी प्रवासी त्रस्त
आम्ही रोज येथे पीएमपी बसस्थानकावर उभा असतो. येथे कचरा टाकण्यात येत असल्याने तो कचरा पावसामुळे कुजून दुर्गंधी येत आहे. शाळेला जाताना वास येतो. मंदिर, उद्यान, बसस्टॉपच्या मध्येच कचर्यामुळे दिवस खराब जात आहे, अशी तक्रार विद्यार्थी, प्रवासी करत आहेत.
स्वच्छता संदेशासमोरच कचर्याचा ढीग
महापालिकेने उद्यानाच्या भिंतीवर स्वच्छतेचा संदेश दिला आहे; परंतु परिसरातील नागरिकांनी या संदेश देणार्र्या फलकासमोरच कचरा टाकण्यात येत आहे. सध्या पावसामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याकडे महापालिकेचा आरोग्य विभाग व उद्यान विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्यानात लोक आरोग्यासाठी येतात. पण बाजूलाच कचर्याचा ढीग असल्याने सकाळी व्यायाम करताना श्वास घेणेही कठीण होते. हे दृश्य अगदी विडंबनात्मक आहे.
डासांचे प्रमाण वाढले
पिंपळे निलखच्या प्रवेशद्वाराजवळ कचर्र्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथून प्रवास करताना नागरिकांना नाक, तोंड दाबून प्रवास करावा लागत आहे.
या भागात 13 गाड्या कार्यरत आहेत. या आठवड्यात मेंटेनन्समुळे उशीर झाला. मात्र, सकाळी 7 पासून सुरुवात करून दुपारी 12 पूर्वी सर्व कचरा उचलला जाईल याची दखल घेतली जाते.
- खंडेराव भैलकवाड, आरोग्य निरीक्षक, ड क्षेत्रिय कार्यालय.
या ठिकाणी ग्रीन मार्शल टीम नेमली आहे. नियमभंग करणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. विभागीय निरीक्षकांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले असून, समस्या लवकर सोडवली जाईल.
- शांताराम माने, आरोग्य विभाग अधिकारी, ड क्षेत्रिय कार्यालय.