

पिंपरी: गणेशोत्सवास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, गणेशभक्तांना महिनाभरापूर्वीच आगमनाचे वेध लागले आहेत. यंदा सजावटीसाठी काही वेगळा पर्याय शोधणार्या भक्तांसाठी आता कापडी सजावटीच्या वस्तूंचा पर्याय उपलब्ध झाला आहे. गणपती आले की मूर्तीसाठी सजावट तर आलीच. पूजेसाठी सामानाची जुळवाजुळव करावी लागते. यामध्ये फुले, आंब्यांची पाने, जास्वंदीची फुले, विड्याची पाने तर हमखास हवी.
हल्ली फुलांचे भाव आणि उपलब्धता कमी असल्याने ताजी फुले आणि पाने मिळणे कठीण असते. त्यामुळे बाजारात आणि ऑनलाईन देखील कापडापासून बनविलेल्या केळीची पाने, विड्याची पाने, जास्वंदीची फुले, आंब्याची पाने उपलब्ध आहेत.(Latest Pimpri News)
सणासुणदीच्या काळात निर्माल्य कुठे टाकायचे? हा प्रश्न असतो. या वस्तूंमुळे निर्माल्याचा प्रश्न निर्माण होत नाही. कारण या वस्तू धुता येऊ शकतात. तसेच दिसायलाही खर्याखुर्या फुलापानांसारखी दिसतात.
एकदा वापरल्यानंतर या धुवून पुन्हा वर्षभरातील इतर सणावारांसाठी वापरता येतात. तसेच दुकानामध्ये प्लास्टिकच्या माळादेखील उपलब्ध आहेत. यांचा इतरही काळात वापर करता येतो. त्यामुळे ग्राहकांचा या गोष्टी घेण्याकडे कल दिसून येत आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने शहरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे सजावटीच्या वस्तूंनी सध्या बाजारपेठेत बहार आली आहे. यंदाच्या वर्षी कापडी आणि प्लास्टिकच्या फुलांच्या माळा बाजारात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी विविध प्रकारांच्या शोभिवंत माळा, कृत्रिम फुले, तोरणे ग्राहकांना आकर्षित करत आहेत. माळामध्ये यंदा वैविध्य पाहायला मिळते. यात रंगीबेरंगी फुले आणि पाने अशा वेगवेगळ्या आकारांतील माळा बाजारात दाखल झाल्या आहेत. याच्या किंमती साधारण 100 ते 150 रुपयांपासून सुरू आहेत. यामध्ये झेंडू, गुलाब, मोगरा फुलांच्या माळा उपलब्ध आहेत. तसेच, वेलीसारख्या दिसणार्या फक्त पानांच्या माळा, गणपतीच्या मागे लावण्यात येणारी पानांची जाळी यांचा समावेश आहे.