

पिंपरी: हिंजवडी, आयटी पार्क फेज - 1, 2 आणि 3 तसेच मेट्रो मार्गासह परिसरात नियमांचा भंग करून ओढे - नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळेच पूर सदृश परिस्थिती निर्माण होत आहे.
13 ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह परस्पर बदलून तसेच प्रवाह रोखणार्यांवर पीएमआरडीए व एमआयडीसीकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Latest Pimpri News)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह एमआयडीसी हद्दीतील ओढे - नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह काही कंपन्या, बिल्डर आणि नागरिकांनी परस्पर रोखला तसेच प्रवाहास बाधा आणली. काही ठिकाणी मर्जीप्रमाणे बांधकामे करण्यात आली.
ही बांधकामे थांबविण्यासाठी संबंधितांना सूचना करण्यात आल्या होत्या; मात्र पीएमआरडीएच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणार्यांवर तसेच नियमबाह्य पद्धतीने बांधकामे करणार्यांवर थेट गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.
हिंजवडीसह परिसरात पावसाचे पाणी साचून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीए तसेच एमआयडीसीकडून परिसरात पाहणी करण्यात आली. यामध्ये अनेक ठिकाणी ओढे तसेच नाल्यांचा प्रवाह रोखण्यात आला होता, तर काही ठिकाणी प्रवाह वळविण्यात आला होता. त्यामुळे हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचा घटना घडल्या.
पावसाचे पाणी साचू नये म्हणून बहुतांश कामे प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसह मेट्रो मार्गिकेलगतचा राडारोडा हटवणे, गटार व नालेसफाई, खड्डे बुजवणे, अनधिकृत स्टॉल हटवणे यासह इतर आवश्यक ती कामे पूर्ण झाल्याने नागरी समस्या निश्चितच सुटणार आहे.
यासह पीएमआरडीए आणि एमआयडीसी हद्दीतील नैसर्गिक ओढे - नाल्यांतील पाण्याचा प्रवाह परस्पर रोखला तसेच स्थलांतरित करण्यात आला, अशी 13 ठिकाणे शोधण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह खुला करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
या भागांत रोखण्यात आला ओढ्या-नाल्यांचा प्रवाह
1) ग्लोबल सेझ टेक पार्कजवळ, भोईरवाडी
2) टाटा कन्सल्टन्सीजवळ, भोईरवाडी
3) मेट्रो पोलिस मेट्रो स्टेशनजवळ, माण.
4) माण देवी मंदिर -1 माण.
5) माण देवी मंदिर, ग्रामपंचायत
6) स्मशान भूमी, माण
7) टेक महिंद्रा आयटी पार्कजवळ, माण
8) क्वाड्रॉन मेट्रो स्टेशन वन विभागाच्या जागेलगत, मान
9) गट नं. 286 जवळ, माण
10) गट नं. 286 जवळ, माण
11) गट नं. 281 जवळ, माण
12) गट नं. 279 जवळ, माण
13) गट नं. 271, 272, 273 जवळ, माण