पहिल्यांदा लक्ष, दुसर्‍यांदा रडारवर ; तिसर्‍यांदा चुकल्यास ‘करेक्ट कार्यक्रम’

पोलिसांच्या आक्रमक धोरणामुळे शहरातील 630 गुन्हेगार रडकुंडीला
Police
पोलिस सतर्कpudhari
Published on
Updated on

शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांनी आक्रमक धोरण राबवले आहे. दोनपेक्षा जास्त गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येत असून, त्यांना तडीपार, स्थानबद्ध किंवा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत अटक करण्यात येत आहे. वर्षभरात 630 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अक्षरशः रडकुंडीला आणले आहे.

अनपेक्षित दणका

मागील वर्षभरात तब्बल 630 सराईत गुन्हेगारांवर कारवाई झाली असून, यातील बहुतांश गुन्हेगार निर्ढावलेले आणि राजकीय वरदहस्त लाभलेले आहेत. आपण काहीही कृत्य केले तरी आपल्याला काहीच होणार नाही, या भ्रमात असलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी कठोर कारवाईतून धडा शिकवला आहे. अनेकांना तडीपार, स्थानबद्ध किंवा मोक्काअंतर्गत अटक करण्यात आले. या कठोर धोरणामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

दुसर्‍या गुन्ह्यानंतर रडारवर, तिसर्‍यांदा थेट कारवाई

पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या धोरणानुसार, एखाद्या व्यक्तीवर दुसर्‍यांदा गुन्हा दाखल झाला, तर ती व्यक्ती थेट पोलिसांच्या रडारवर येते. त्यानंतर त्या व्यक्तीवर सतत लक्ष ठेवले जाते. त्या व्यक्तीवर तिसर्‍यांदा गुन्हा नोंदवला गेला, तर कोणत्याही संधीची वाट न पाहता थेट कठोर कारवाई करण्यात येते. या धोरणाचा उद्देश सराईत गुन्हेगारांना वारंवार गुन्हे करण्यापासून रोखणे आहे. या धोरणामुळे अनेक गुन्हेगारांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.

पोलिस आयुक्त आक्रमक

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याचे काम सुरू आहे. चौबे यांनी आपल्या विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सराईत गुन्हेगारांबाबत कोणतीही दयामाया न ठेवता कठोर कारवाई केली जावी. स्थानबद्ध करणे, तडीपार करणे किंवा मोक्काअंतर्गत कारवाई करणे यांसारख्या कठोर कारवाईचा अवलंब करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

गुन्हेगारांमध्ये भय

गेल्या वर्षभरातील कठोर कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक सराईत गुन्हेगारांनी आपले ठिकाण बदलले असून, काहींनी गुन्हेगारीच्या वाटेवरून माघार घेतली आहे. यामुळे शहरात सध्या शांततेचे वातावरण असून, गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

धडा घ्या, अन्यथा कारवाई...

पोलिस प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, कोणतीही व्यक्ती गुन्हेगारीत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्यास दुसर्‍या गुन्ह्यानंतर पोलिसांच्या रडारवर याल आणि तिसर्‍या वेळेस कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news