

पिंपरी: आपण सर्व जण इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. सोबतच, महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्तीची नाही, असेही त्यांनी नमूद केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिंदीच्या सक्तीवर राज ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप स्पष्टपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, माझी राज ठाकरेंशी चर्चा झाली.
दोनच भाषा असल्या पाहिजेत, यावर ते आग्रही आहेत. तिसरी भाषा असू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक, केंद्र सरकारने विचारपूर्वक ‘एनईपी’मध्ये तीन भाषांचे सूत्र आणले आहे.देशभरात तीन भाषांचे सूत्र असेल, तर महाराष्ट्रात दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संपूर्ण देशासाठी आहे. (Latest Pimpri News)
तामिळनाडूने तीन भाषांच्या सूत्राला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले; पण त्यांची याचिका फेटाळली गेली. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) तीन भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही.
हिंदीची अनिवार्यता काढली
हिंदी भाषा शासनाने यापूर्वी अनिवार्य केली होती. तथापि, मंगळवारी रात्री उशिरा काढलेल्या शासन निर्णयाद्वारे ही अनिवार्यता काढून टाकण्यात आली आहे. आता कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल.
तीन भाषेच्या सूत्राचा नवीन शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात आला आहे. त्यात मातृभाषा अनिवार्य आहे. त्याशिवाय दोन भाषा व त्यातील एक भारतीय भाषा असावी, असे हे सूत्र आहे. यापैकी एक भाषा म्हणून लोक इंग्रजीला प्राधान्य देतात. त्यानंतर कुठलीही एक भारतीय भाषा म्हणून हिंदी म्हटले होते. कारण, आपल्याकडे हिंदीचे शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात.
कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्यासाठी केवळ वीस विद्यार्थी असले तरी शिक्षक देता येईल. सोबतच ऑनलाइन पद्धतीनेही प्रशिक्षण दिले जाईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री