

पिंपरी: पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीच्या पाण्यात गाळ, झाडपाला, सांडपाण्यासह इतर कचरा वाहून येतो. त्यामुळे हे पाणी काही प्रमाणात गढूळ असते. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नियमांप्रमाणे शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
पाण्याची चव बदललेली जाणवत असली तरी ते पाणी पिण्यायोग्य आहे, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. तसेच, पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.(Latest Pimpri News)
शहराला मावळमधील पवना व आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यातील चार महिने धरणातील साठा न वापरता नदीतील पाण्याचा वापर होतो. या कालावधीत नदीच्या पाण्यात गाळ, झाडपाला व सांडपाण्यासारखा कचरा वाहून येतो. यामुळे पाणी गढूळ होते व टीडीएस म्हणजे एकूण विरघळलेल्या घनपदार्थांचे प्रमाण वाढते. याचा परिणाम पाण्याच्या चव व वासावर किंचित प्रमाणात होतो.
महापालिका रावेत बंधार्यावरून अशुद्ध पाणी उचलते. तेथून ते निगडी येथील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. तसेच, आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधार्यावरून उचलून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संघटनेच्या सर्व नियमांनुसार तेथे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अशुद्ध पाणी शुद्ध केले जाते. नंतर हे पाणी विविध टाक्यांमध्ये साठवले जाते. त्यामधून पाणीपुरवठा केला जातो.
गढूळ पाणी येत असल्यास तक्रार करा
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणी थोडे गढूळ होणे हे सर्वत्र स्वाभाविक आहे. यासाठी उपाय म्हणून नागरिकांनी पाणी उकळून वापरावे. गढूळ पाण्याच्या तक्रारी असलेल्या भागात महापालिकेचे विशेष लक्ष आहे. ज्या भागात गढूळ पाणी येत आहे, तेथील नागरिकांनी स्थानिक पाणीपुरवठा कार्यालय किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तक्रारींवर तात्काळ कार्यवाही केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.