

Pimpri: पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीन विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत, एकूण वैध मतांपैकी 1/6 किंवा त्यापेक्षा कमी मते मिळालेल्या एकूण 41 उमेदवारांच्या अनामत रकमा(डिपॉझिट) जप्त झाल्या आहेत. पिंपरी मतदारसंघातील 13, चिंचवड येथील 19 आणि भोसरी येथील 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या तीनही मतदारसंघात विजयी आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार वगळता अन्य सर्व उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे भरलेले डिपॉझिटही राखता आले नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातून अनुक्रमे 21, 7 आणि 7 उमेदवारांनी 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अर्ज मागे घेतले होते. त्या उमेदवारांचे डिपॉझिट त्यांना परत केले जात आहे. मात्र, ज्या उमेदवारांना एकूण वैध मतांपैकी किमान 1/6 म्हणजे 16.66 टक्के एवढी मते घेतलेली नाहीत, त्यांना डिपॉझिट गमवावे लागणार आहे.
सर्वसाधारण गटातील उमेदवारांकडून 10 हजार तर, अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) उमेदवारांकडून 5 हजार रुपये इतकी अनामत रक्कम उमेदवारी अर्ज भरताना जमा करुन घेण्यात आली होती. पिंपरी मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात एकूण 15 उमेदवार होते. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांची डिपॉझिट रक्कम वगळता अन्य 13 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
चिंचवड मतदारसंघातून 21 उमेदवार रिंगणात होते. त्यातील भाजपाचे उमेदवार शंकर जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे वगळता अन्य 19 उमेदवारांना त्यांचे डिपॉझिट गमवावे लागणार आहे. भोसरी मतदारसंघातून 11 उमेदवार निवडणूक लढवित होते. त्यापैकी भाजपाचे उमेदवार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अजित गव्हाणे वगळता अन्य 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात वैध मतांच्या 1/6 मते न मिळविणाऱ्या 13 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव होता. त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये इतके डिपॉझिट घेतलेले होते. ज्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत अर्ज मागे घेतले, त्यांची डिपॉझिट रक्कम परत केली जात आहे.
- अर्चना यादव, निवडणूक निर्णय अधिकारी, पिंपरी विधानसभा मतदारसंघ
भोसरी विधानसभा मतदारसंघात वैध मतांच्या 1/6 मते न मिळविणार्या 9 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 7 तर, एससी/एसटी प्रवर्गातील 2 उमेदवार आहेत. त्यांचे 80 हजार डिपॉझिट जप्त केले आहे.
- रेवणनाथ लबडे, निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विधानसभा मतदारसंघ.