थोरातांना नडला अतिआत्मविश्वास; विखेंनी घेतला लोकसभेतील पराभवाचा बदला..!

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात - संगमनेरात धक्कादायक पराभव झाला.
Vikhe Vs Thorat
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुन्हा विखे-थोरात संघर्ष?Pudhari
Published on
Updated on

संदीप रोडे

महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात - संगमनेरात धक्कादायक पराभव झाला. अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने त्यांचा तब्बल 12 हजार मतांनी पराभव केला. खताळ जायंट किलर ठरले. लोकसभेला डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव करण्यात मोठा वाटा असणार्‍या थोरातांना त्यांच्याच संगमनेरात पराभवाची धूळ चारत विखे पाटलांनी त्या पराभवाची परतफेड केली. विखे पाटील यांनी थोरातांची दहशत अन् विकासाचा पुढे केलेला मुद्दा संगमनेरकरांना भावल्याची परिणती खताळ यांच्या विजयात झाली.

संगमनेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून 1951 पासून आतापर्यंत तेथून काँग्रेस उमेदवाराचा सतत विजय झाला आहे. 1951 मध्ये गोपाळ श्रावण भांगरे हे संगमनेरचे पहिले आमदार झाले. त्यानंतर 1957 मध्ये काँग्रेसचे सगाजी देशमुख यांचा पराभव करत नारायण रामजी नवले हे अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर सलग तीन टर्म 1972 पर्यंत भिकाजी जिजाबा खताळ काँग्रेसकडून विजयी झाले. 1978 मध्ये बाळासाहेब थोरात यांचे वडील भाऊसाहेब थोरात संगमनेरचे आमदार झाले.

Vikhe Vs Thorat
Ahilyanagar Politics: टायगर अभी जिंदा है! डॉ. सुजय विखे यांचा संगमनेरात इशारा

1980ला काँग्रेसने पुन्हा बी. जे. खताळ यांना उमेदवारी दिली अन् ते विजयीही झाले. 1985 मध्ये बाळासाहेब थोरात काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते; पण काँग्रेसने शंकुतला थोरात यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बाळासाहेब थोरात अपक्ष मैदानात उतरले. तेव्हापासून 2019 पर्यंत बाळासाहेब थोरात सलग आठ वेळा विजयी होत आले. यंदा नवव्या खेपेला मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

अहिल्यानगर जिल्ह्यात थोरात-विखे ही मातब्बर राजकीय घराणी असून दोघांतील राजकीय हाडवैर राज्याला ठाऊक आहे. 1985 ला बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली, त्याला (स्व.) बाळासाहेब विखे पाटील कारणीभूत असल्याचे मानून थोरात-विखे संघर्षाची ठिणगी पडली. दोघेही एकाच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये असतानाही राजकीय द्वंद्व सुरू होते. पुढे 2019 मध्ये विखे पाटील भाजपमध्ये गेले.

दोघांचे पक्ष वेगवेगळे झाल्याने राजकीय विरोधाला आणखी धार आली. 2019 मध्ये डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. 2024 मध्ये ते नगरमधून पुन्हा भाजपच्या तिकिटावर खासदारकीला उभे राहिले. शरद पवारांनी नीलेश लंके या नव्या दमाच्या उमेदवाराला विखे यांच्या विरोधात मैदानात उतरविले. थोरात यांनी लंके यांच्यामागे पाठबळ उभे करत विखेंच्या पराभवासाठी ताकद लावली. त्यातून सुजय विखे यांचा पराभव झाला अन् लंके जायंट किलर ठरले.

Vikhe Vs Thorat
Ajit Pawar: अजित पवारांच्या विजयाने वाढणार विकासाची गती; बारामतीकरांची अपेक्षा

या पराभवाचा सल सुजय यांच्यासह त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनात होताच. त्यामुळेच सुजय यांनी 2024 ची विधानसभा संगमनेरातून लढविण्याची तयारी केली होती. मात्र वसंतराव देशमुख नावाच्या व्यक्तीने थोरातांची कन्या जयश्री थोरात यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याने भाजप अर्थात विखे यांच्या विरोधात रोष निर्माण झाला. परिणामी भाजपने ही जागा सोडली आणि शिंदे सेनेला दिली. त्यातून विखेंची उमेदवारी डावलली गेली; मात्र विखे यांनी त्यांचाच कार्यकर्ता असलेल्या अमोल खताळ यांना शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी मिळविली.

खताळ यांच्या विजयासाठी विखे पिता-पुत्रांनी प्रचारात थोरातांच्या दहशतीवर बोट ठेवताना विकासाच्या मुद्द्यावर त्यांना घेरले. विखे पाटील हे थोरातांविरोधात प्रचारात आघाडी घेत असताना तिकडे थोरात मात्र प्रचंड आत्मविश्वासात राज्यभर सभा घेत फिरत राहिले. थोरातांच्या प्रचाराची सगळी जबाबदारी त्यांची कन्या जयश्री यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर आली. मात्र विखे पाटील यांनी त्यांचे राजकीय आडाखे नेस्तनाबूत करत संगमनेरात मतपेरणी केली. परिणामी अमोल खताळ हे नवखे उमेदवार थोरातांचा पराभव करत जायंट किलर ठरले.

सहाव्या वेळी बाणाने घेतला वेध

1990 मध्ये वसंत गुंजाळ यांनी भाजपकडून बाळासाहेब थोरातांविरोधात निवडणूक लढविली होती. मात्र गुंजाळ यांचा 4862 मतांनी पराभव झाला होता. 1999 पासून थोरातांचा पराभव करण्याच्या आशेने शिवसेना लढत होती; मात्र सतत अपयश येत होते. बापूसाहेब गुळवे, संभाजी थोरात, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर, साहेबराव नवले यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत थोरातांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो फेल गेला.

यंदा मात्र शिवसेनेचे अमोल खताळ यांनी थोरातांच्या विरोधात धनुष्य उचलले. विखेंच्या भात्यातील खास बाण त्यांना मिळाले. या बाणाच्या टोकाला ‘गणेश’पासून ‘नगर’पर्यंतच्या पराभवांतून आलेला संयम, संगमनेरातील पाण्यापासून दुधापर्यंतच्या प्रश्नांची ताकद होती. परिणामी थोरातांचा राजकीय वेध घेण्यात त्या बाणाला यश मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news