

पंकज खोले
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी पुण्यातील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. हे हेलपाटे वाचविण्याच्या दृष्टिकोनातून खराळवाडी येथील पोस्ट कार्यालयातील सेवा केेंद्रात पासपोर्ट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली. गेल्या आठ वर्षांपासून ही सुविधा कार्यान्वित आहे. दरम्यान, शहराची वाढती लोकसंख्या आणि पासपोर्ट काढणार्यांच्या संख्येत झालेली वाढ, यामुळे येथील सेवा केंद्रात नागरिकांना अपॉईंटमेंटसाठी तीन महिने वेटिंग करावे लागत आहे.
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहराचा देखील विस्तार वाढत आहे. हिंजवडी आयटीनगरी, औद्योगिकनगरी तसेच एज्युकेशनल हब म्हणूनही शहराची ओळख निर्माण झाली आहे. शहरात नोकरी, उद्योग-व्यवसायासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे; तसेच शहरातून विविध कारणांसाठी परदेशी जाणार्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तर काहीजण पर्यटनासाठी परदेशी जातात. त्यामुळे नागरिक पासपोर्ट काढतात. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी येथील नागरिकांना पुण्यातील कार्यालयात हेलापाटे मारावे लागत असत.
त्यामुळे संपूर्ण दिवस वाया जात होता. त्यामुळे येथील नागरिकांचा वेळ तसेच त्रासापासून सुटका होण्यासाठी 2 एप्रिल 2017 पासून पिंपरी- चिंचवड येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले. पहिल्या टप्प्यात अर्जांची संख्या कमी असल्याने अपॉईटमेंटची संख्या कमी होती. त्यानंतर टप्प्याटप्याने पासपोर्टसाठीच्या अपॉईंटमेंटच्या संख्येत वाढ करण्यात आली. सद्यस्थितीत दररोज 80 अपॉईमेंट या कार्यालयातमार्फत घेण्यात येत आहेत. शहरातील एकूण आलेल्या अर्जांपैकी केवळ 80 अर्ज या ठिकाणी स्वीकारले जातात. दरम्यान, शहरातील पासपोर्टसाठीच्या अॅपाईमेंट संख्येत वाढ करणे; तसेच कार्यालयाचा विस्ताराबाबत माहिती घेण्यासाठी पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अर्जुन देवरे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.
पोस्ट कर्मचार्यांचेही सहकार्य
पासपोर्टच्या कामकाजात पोस्टातील दोन सहायक कर्मचारीदेखील काम करत असल्याने हे कामकाज थोडे सुलभ होत आहे; तसेच ही प्रक्रिया अधिक सुलभ कशी होईल, यासाठी पोस्ट खात्याकडून उपाययोजना केली जाते, अशी माहिती पोस्टाचे जनसंपर्क निरीक्षक काळुराम पारखी यांनी सांगितले.
अपॉईंटमेंटची संख्या वाढविणे गरजेचे
पिंपरीतील खराळवाडी या केंद्रात यंदाच्या वर्षात 16 हजार 376 जणांना पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महिनाकाठी 1 हजार 429 अर्ज प्राप्त होत आहेत. आठवडयाला साडेतीनशे पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण होते; मात्र पासपोर्ट काढणार्यांची वाढती संख्या लक्षात घेता येथील कार्यालयातील अपॉईंटमेंटची संख्या वाढविणे तसेच कार्यालय विस्तारीकरणाची गरज आहे. त्यामुळे येथील कामास आणखी गती मिळू शकेल.