

पिंपरी: मतदार यादीतील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या तयारीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व नवनियुक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकार्यांना पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे प्रशिक्षण देण्यात आले. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीरहित करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण देण्यात आले. बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी 30 जूनपासून सुरू करणार आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील बीएलओ यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी प्रगणना पत्रक भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, घरभेटीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भोसरी मतदारसंघात सध्या 6 लाख 36 हजार 424 मतदार आहेत. मतदार यादीतील मॅपिंगचे प्रमाण 58.66 टक्के आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी 483 बीएलओ व 48 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीएलओ घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार
30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ घरभेटी देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. या वेळी प्रगणना पत्रके भरून घेण्यात येणार असून, मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार आहे.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले, की मतदार यादी अद्ययावत व त्रुटीरहित ठेवण्यासाठी घरभेटींच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. नागरिकांनी कुटुंबातील सदस्यांचे मॅपिंग चुकीचे असल्यास किंवा इतर विसंगती आढळल्यास ती बीएलओंच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन तहसीलदार तथा तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी सतीश थेटे यांनी केले.
या वेळी सहाय्यक आयुक्त तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अजिंक्य येळे, परशुराम वाघमोडे, नायब तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी विकी परदेशी उपस्थित होते.