

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची सुपारी निघाली असून, मीच ती सुपारी घेतली आहे, अशी धमकी एकाने थेट पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल करून दिली. हा प्रकार शनिवारी (दि. ८) दुपारी घडला. दरम्यान, पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सूत्रे फिरवत अवघ्या काही तासातच संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. उदयकुमार रॉय (वय २७, रा. मोशी, मूळ रा. छत्तीसगड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. (Mahesh Landge News)
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी डायल ११२ या पोलिस नियंत्रण कक्षावर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. 'भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची सुपारी निघाली असून, मीच ती सुपारी घेतली आहे', अशी माहिती त्याने दिली. या कॉलची गंभीर दखल घेत पोलिसांनी अवघ्या काही तासातच संबंधित आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीने दारूच्या नशेत किंवा खोडसाळपणे हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करत आहेत.
आरोपी उदयकुमार हा सीएनसी ऑपरेटर असून, भोसरी एमआयडीसीत एका कंपनीत कामाला आहे. मागील पाच वर्षांसून तो मोशी येथे वास्तव्यास आहे. दारूच्या नशेत उदयकुमार याने फोन केल्याचे समोर आले आहे; मात्र त्याने अशा प्रकारचा फोन का केला, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.