

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात बावधन पोलिसांनी आत्तापर्यंत 19 साक्षीदारांची चौकशी केली असून, यामधून प्रकरणाच्या पार्श्वभूमीतील अनेक गंभीर बाबींचा उलगडा होत आहे. तपासाचा वेग वाढल्याने प्रकरण निर्णायक वळणावर येत असून, पोलिसांकडून आरोपींविरोधातील पुरावे अधिक सशक्त केले जात असल्याचे दिसून येत आहे. (Pimpari chinchwad News)
याबाबत सविस्तर वृत्त असे, की 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर 17 मे रोजी तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे या तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्यांनाही अटक केली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या दहा महिन्यांच्या बाळाचा ताबा न देणारा सहआरोपी नीलेश चव्हाण नेपाळपर्यंत पळून गेला होता. मात्र, त्यालाही पोलिसांनी उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथून अटक केली आहे.
वैष्णवीच्या इतर मैत्रीणीसह आणखी काही साक्षीदारांची चौकशी लवकरच होणार आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. पोलिसांकडून तांत्रिक आणि कायदेशीर बाजू बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. साक्षी, पुरावे आणि आरोपींच्या जबाबांवरून लवकरच अंतिम निष्कर्षास पोहचण्याची शक्यता आहे.
अनिल विभूते,वरिष्ठ निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे
सध्या शशांक, लता, करिष्मा, राजेंद्र व सुशील हगवणे हे न्यायालयीन कोठडीत, तर नीलेश चव्हाण पोलिस कोठडीत आहे. नीलेशकडून बाळासंदर्भातील माहिती व मृत्यूपूर्वी घडलेल्या वादावादीच्या पार्श्वभूमीची चौकशी सुरू आहे. वैष्णवीच्या आत्महत्येच्या काही तासांपूर्वी घडलेल्या वादांची, फोन कॉल्सची आणि मेसेजेसची जुळवाजुळव करण्यात येत आहे.
तपासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पोलिसांनी घटनेच्या दिवशीची क्राईम सीन रिक्रिएशन केली. शशांक हगवणे याने सांगितलेल्या हालचाली, वेळा आणि प्रत्यक्ष सीसीटीव्हीमध्ये दिसणार्या हालचाली यांची तुलना करण्यात आली. यासाठी पोलिस, पंचसाक्षीदार, सायबर तज्ज्ञ आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांची उपस्थिती होती.
संपूर्ण तपासात पिंपरी-चिंचवड पोलिसांची 6 आणि पुणे पोलिसांची 3 पथके सक्रिय आहेत. पोलिसांनी गुन्हे शाखा युनिट 4, सायबर सेल, फॉरेन्सिक आणि तांत्रिक शाखांची मदत घेतली आहे.