

Vaishnavi Hagawane Case Accused Nilesh Chavan Arrested
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. नीलेशला नेपाळ बॉर्डरवरुन ताब्यात घेतल्याचे वृत्त असून पोलिसांच्या गुंडाविरोधी पथक आणि युनिट चारने ही कारवाई केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नीलेश चव्हाण सहआरोपी असून नुकतेच पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट काढले होते. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर तिच्या बाळाला घरी आणण्यासाठी कस्पटे कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू होते. वैष्णवीचे बाळ हे कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या नीलेशकडे होते. गेल्या आठवड्यात बाळाला आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाशी नीलेशने वाद घातला आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवला होता. या प्रकरणी नीलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच नीलेश पसार झाला होता.
नीलेश चव्हाणविरोधात पत्नीचीही तक्रार
नीलेश चव्हाणविरोधात 2022 मध्ये वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आपल्या पत्नीचे घरात स्पाय कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीनेच पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. नीलेशची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहते.
वैष्णवीप्रकरणातील सहआरोपी
वैष्णवीचा मुलगा हा काही काळ नीलेशकडे होता. या काळात नीलेशने बाळाची योग्य काळजी घेतली नाही आणि त्यामुळे बाळ अशक्त झाल्याचा आरोपही वैष्णवीच्या नातेवाईकांनी केला होता. यानुसार पोलिसांनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 आणि 87 नुसार नीलेशविरोधात गुन्हा दाखल केला तसेच त्याला वैष्णवी प्रकरणात सहआरोपीही केले होते.