

नवी सांगवी : औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन विभाग आहे; परंतु हा विभाग सकाळी दहा ते सायंकाळी साडेसहा यावेळेतच सुरू असतो. सायंकाळी साडेसहानंतर ते दुसर्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मृताच्या नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे 24 तास हा विभाग सुरू करण्याची मागणी होत आहे. (Latest Pimpari chinchwad News)
अनेकदा रुग्णालयातील मृतांचे अथवा बाहेरून येणार्र्या मृत व्यक्तींचे साडेसहानंतर शवविच्छेदन करण्यात येत नाही. यामुळे नातेवाईकांना रात्रभर शवविच्छेदनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वायसीएम रुग्णालय येथे रात्री बारा ते सकाळी सहा ही वेळ सोडून दिवसभर शवविच्छेदन विभाग सुरू असतो. तर ससून रुग्णालय येथे 24 तास शवविच्छेदन विभागात मृतांचे शवविच्छेदन करण्यात येते. काही नातेवाईकांकडून असे सांगण्यात येते की, पैशाने गडगंज आणि मोठ मोठ्या लोकांचे रुग्णालयाशी संपर्क असल्यास रात्री, अपरात्री त्यांच्या मृत व्यक्तीचे शवविच्छेदन त्वरित करण्यात येते. मात्र, सामान्य नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याची भावना नातेवाईक व्यक्त करत आहेत.
इतकेच नव्हे, तर 2018 पासून 2023 पर्यंत येथील शवविच्छेदन विभागात फॉरेन्सिक डॉक्टर उपलब्ध होते. या काळात सकाळी सात वाजल्यापासूनच शवविच्छेदन विभाग सुरू होत असे. गेली दोन वर्षांत येथील विभागात रुग्णालयाचे एमबीबीएस डॉक्टर आणि एक कर्मचारी (मामा) कार्यरत आहेत. यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नातेवाईकांना मृताचे शवविच्छेदन करण्यासाठी रात्रभर जागून तासंतास प्रतीक्षेत रहावे लागत आहे.
खून, आत्महत्या, अपघात, आकस्मिक मृत्यू किंवा संशयास्पद मृत्यू झाला असेल, तर मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी अनेकदा पोलिस व आरोग्य विभागाच्या मदतीने मृताचे शवविच्छेदन केले जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे चित्र शवविच्छेदन अहवालातून कळते. त्यासाठी अनेकदा मृताचे शवविच्छेदन करण्यात येत असते. गेल्या नऊ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारी ते 15 सप्टेंबरपर्यंत औंध जिल्हा रुग्णालय येथील शवविच्छेदन विभागात एकूण 970 मृतांचे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती येथील शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी दिली.