

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दर महिन्यास शहरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. महापालिकेने चार महिन्यांत 30 हजारांपेक्षा अधिक नमुने तपासले आहेत. सर्व नमुन्यात पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
पवना धरण आणि आंद्रा धरणातून पाणी उचलून ते शास्त्रोक्त पद्धतीने पाणी शुद्ध करून संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला पुरविले जाते. पिंपरी-चिंचवड शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तब्बल सहा वर्षांपासून शहराला दोन दिवसांतून एकवेळ पाणी मिळत आहे. दोन दिवसांचे पाणी एकवेळ दिले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यामुळे सखल व शहराच्या टोक्याचा भागांत पुरेसे पाणी मिळत असल्याच्या तक्रारी शहरभरात कायम आहेत. उन्हाळ्यात पाणी कमी तसेच, दूषित मिळत असल्याच्या तक्रारींत मोठी वाढ झाली आहे. तसेच, पावसाळ्यात गढूळ पाण्याचा तक्रारी वाढतात.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 30 हजारांपेक्षा अधिक पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, मान्यताप्राप्त खासगी एजन्सीकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. संसर्गजन्य आजार वाढल्यानंतर आणि नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या भागांतील पाण्याचेही नमुने घेतले जातात. त्या पाण्याचेही दोन्ही प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. महापालिकेने केलेल्या सर्व पाण्याच्या नमुने निगेटिव्ह आहेत म्हणजे महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य आहे, असा अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करतानाही प्रत्येक तासाला पाण्याच्या दर्जाची तपासणी केली जाते. निगडी, सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात 24 तासांत वेगवेगळ्या टप्प्यावर तब्बल 288 वेळा पाण्याचा दर्जा तपासला जातो. तर, चिखली केंद्रात 24 तासांत तब्बल 72 वेळा पाण्याचा दर्जा तपासला जातो. त्यामुळे पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया योग्य प्रकारे झाली की नाही, हे तपासले जाते. त्यामुळे महापालिकेचे पिण्याचे पाणी शुद्ध असते, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
शहरात खासगी विहिरी आहेत. तसेच, हाऊसिंग सोसायटी व बंगल्यात बोअरिंग असते. ते पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, याची तपासणी महापालिकेच्या निगडी येथील मध्यवर्ती प्रयोगाशाळेत करून दिली जाते. एका पाण्याच्या नमुन्यासाठी 1 हजार 110 रूपये शुल्क आकारले जाते. या प्रकारे शहरातून अनेक भागांतील पाण्याची तपासणी केली जाते. विहिर आणि बोअरींगचे पाणी पिण्यायोग्य आहे, याची तपासणी दर वर्षी करून घेणे आवश्यक आहे. तपासणी अहवाल 48 तासांत दिला जातो, असे अधिकार्यांनी सांगितले.
महापालिकेने संपूर्ण शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणीपुरवठा व्यवस्थापनात किंवा गळती होऊन पाणी कोठे दूषित झाले का, हे तपासण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी शहरभरात फिरून पाण्याचे नमुने घेतात. महिन्यास साधारण 4 हजार ते 4 हजार 500 पाण्याचे नमुने बंद बाटलीत घेतले जातात. त्याची निगडी येथील मध्यवर्ती प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. कॉलरा, जीबीएस अशा आजाराच्या काळात पाण्याचे नमुने अधिक संख्येने घेतले जातात. प्रत्येक महिन्याचा पाणी नमुने तपासणी अहवाल राज्य सरकारला पाठविला जातो, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे चीफ केमिस्ट प्रशांत जगताप यांनी सांगितले.
महापालिकेने शुद्ध केलेले पाणी पुरवठा करताना जलवाहिनी, टाकी, गळती किंवा इतर माध्यमातून दूषित होण्याचा धोका असतो. त्यामुळे महापालिकेकडून दिल्या जाणार्या पिण्याच्या पाण्याचे नियमितपणे तपासणी केली जाते. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील विविध भागांतील पाण्याचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23, निगडी, प्राधिकरण येथील जलशुद्धिकरण केंद्रातील मध्यवर्ती प्रयोगशाळेत ती तपासणी होते. दर महिन्यास सरासरी 5 हजार नमुने तपासले जातात.