

नगर : प्रेम आंधळ असतं अस म्हणतात... आता त्याला सोशल मिडीयामुळे आणखीच बळ मिळाले आहे. फेब्रुवारी ते मार्च असा महाविद्यालयीन, शाळांचा परीक्षेचा काळ असतो. याच परीक्षेच्या काळात मुली पळून गेल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात तीन महिन्यांत सुमारे 136 अल्पवयीन मुली पळून गेल्या त्यातील केवळ 71 मुली सापडल्या, तर पोलिस दप्तरी अद्याप मुली बेपत्ता आहेत. (Ahilyanagar latest Update)
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी प्रेमसंबंध हे प्रमुख कारण आहे. मात्र, अशाच काही घटनांमधून अघटित घटना घडल्याची उदाहरणे समोर आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांच्या सरासरीची तुलना केली असता गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक मुली पळून गेल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षेचा काळ असतो. याच काळात नेमक्या मुली पळून गेल्या आहेत. शाळकरी वयामध्ये एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे आणि त्यातून मुलांच्या आमिषाला बळी पडून मुली पळून जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून परराज्यातील एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे. प्रेमाच्या आणाभाका घेणे, नंतर घरातून निघून जाणे असे साधारणपणे घडताना दिसते. कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती ही कारणेदेखील त्यात समोर आली आहेत. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातून 136 मुली पळून गेल्या आहेत. त्यापैकी अवघ्या 71 मुली सापडल्या आहेत. अन्य बेपत्ता मुलींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
कोतवाली, तोफखाना पोलिस ठाण्यात अन्य मिसिंगचे गुन्हे दाखल झाले आहेत की मुलगी आई, वडिलांबरोबर परीक्षेला आली. परीक्षा केंद्रात गेल्यानंतर ती पुन्हा बाहेर आलीच नाही. आई-वडील तिची गेटवर वाट पाहून कंटाळले. अखेर परीक्षा विभागात जाऊन विचारणा केली असता तुमची मुलगी पेपर देऊन निघून गेली अशी माहिती मिळाली. आई-वडील हताश होऊन कॉलेजमधून बाहेर पडतात.
मुलगी दहावी, बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. अशा काळात आई मुलीची मैत्रीण झाली पाहिजे. मुलीच्या आवडी, निवडी आईला माहीत असाव्यात. मुलीच्या कोण मैत्रीण आहेत. ती मैत्रिणीकडे कधी जाते याची माहिती आईला असणे आवश्यक आहे. अधूनमधून मुलीचा मोबाईल तपासणे. तिचा मित्र परिवार आईलाही माहीत असला पाहिजे.
मुलींना पहिल्या अपेक्षा आता कमी वयामध्ये समज येऊ लागली आहे. त्यामुळे मुलगी आठवीमध्ये गेल्यानंतर आईने तिच्या मैत्रीण होऊन राहिले पाहिजे. मुलींना मोबाईलपासून दूर कसे ठेवता येईल, याचा विचार आई-वडिलांनी करावा.
अॅड. अनुराधा येवले, सदस्य, बालकल्याण समिती, अहिल्यानगर
पालकांनो मुलीची काळजी घ्या...
मुलगी शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असेल तर अधूनमधून त्या महाविद्यालयात गेलं पाहिजे. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांच्याशी सतत संपर्क ठेवा. मुलीच्या अभ्यासाविषयी नेहमी जाणून घेत राहा. ती कोणत्या बसने कॉलेजला जाते आणि येते याची माहिती पालकांना हवी. तिचे मैत्रिणी, मित्र याही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे, असे याविषयातील जाणकार आणि पोलिस अधिकारीही सांगतात.