

मिलिंद कांबळे
पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांत वॉर्ड टू वॉर्ड भेटी देत अक्षरश: पिंपरी-चिंचवड शहर पिंजून काढले. या दौऱ्यात माजी नगरसेवक तसेच छोट्या-मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. सर्व स्तरांतील नागरिकांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत खंबीरपणे उभा असल्याचा संदेश विरोधकांसह भाजप व शिवसेनेला (एकनाथ शिंदे) दिला. पक्षाच्या या परिवार मिलनातून पवार यांनी नव्या दमाने पिंपरी-चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pimpari chinchwad News)
महापालिका निवडणूक दिवाळीनंतर केव्हाही होण्याची दाट शक्यता आहे. फेबुवारी 2017 ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यस्त दिनचर्येतून दोन दिवस पिंपरी-चिंचवड शहराला दिले होते. शनिवारी (दि. 20) व रविवारी (दि. 21) असे संपूर्ण दोन दिवस ते संपूर्ण शहरात फिरले. सकाळी सातला सुरू झालेला दौरा रात्री उशीरा संपला.
व्यापारी, रिक्षाचालकांशी साधला संवाद
पवार यांनी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वॉर्डात आवर्जून राष्ट्रवादी काँग््रेास परिवार मिलन कार्यक्रम घेतला. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुणी, कामगार, व्यापारी, विक्रेते, रिक्षाचालक, विद्यार्थी, हाऊसिंग सोसायटीचे सदस्य आदींच्या अडचणी व समस्या जाणून घेतला. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांची माहिती घेतली. तेथूनच संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही दिले.
कार्यकर्त्यांच्या घरी केले जेवण
परिवार मिलन कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग््रेासने प्रचार करण्याची संधी सोडली नाही. पक्षाचे माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांचा वॉर्डात व घरी जावून ते मतदारांना भेटले. सोबत असल्याची विश्वास त्यांनी नागरिकांमध्ये निर्माण केला. येत्या निवडणुकीत साथ दिल्यास पिंपरी-चिंचवडला राष्ट्रवादी काँग््रेास देशात क्रमांक एकचे शहर बनवेल, असे आश्वासन त्यांनी दिले. पवारांनी संपूर्ण शहर पिंजून काढत, शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांच्या घरी जेवणही केले.
या दौऱ्याची संपूर्ण शहरात जोरदार जाहिरातबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आली. सोशल मीडियावर या उपक्रमांचे व्हिडिओ व छायाचित्रेही मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले. या माध्यमातून महापालिका निवडणुकीचा प्रचाराला पक्षाने सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. हातातून निसटलेली महापालिका पुन्हा ताब्यात घेण्याचे स्पष्ट संकेत या दौऱ्यातून देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
माझे शहर असल्याने गाठीभेटी घेत आहे
आगामी महापालिका निवडणुकीसाठी परिवार मिलन कार्यक्रम आयोजित केल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, की राजकारणात काम करताना सर्वांशी संपर्क ठेवावा लागतो. अडीअडचणी समजून घ्यावा लागतात. मी अनेक वर्षे या शहराचे नेतृत्व केले. सन 2017 चा अपवाद वगळता शहराने मला 25 वर्षे पूर्ण पाठींबा दिला आहे. शहराच्या सर्वांगिक विकासासाठी मी काम केले असून, संपर्क साधण्यासाठी गाठीभेटी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनसंवाद सभेला तब्बल 4 हजार 800 तक्रारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवडमधील पहिल्याच जनसंवादाला तब्बल 4 हजार 800 तक्रारींचा पाऊस पडला. पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या जनसंवादाला शहरवासीयांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यात पाणी, कचरा, स्वच्छता, वाहतूक, गुंडगिरी आदी प्रश्न नागरिकांनी मोठ्या संख्येने मांडले. अजित पवारांमुळे तक्रारींवर तातडीने कार्यवाही होत असल्याने दिलासा मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
चिंचवड, भोसरी विधानसभेतही घेणार जनसंवाद
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद घेतला. चिंचवड व भोसरीत भाजपचे आमदार आहेत. त्या मतदार संघातही जनसंवाद घेण्यात येणार आहे, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या दोन्ही विधानसभावरही राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे दिसत आहे.
या ठिकाणी झाले परिवार मिलन
पहिला दिवस-पिंपळे सौदागर, पिंपरी कॅम्प, मोरवाडी, रामनगर-चिंचवड, संभाजीनगर, काळभोरनगर, मोहननगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी-आकुर्डी, निगडी-प्राधिकरण. दुसरा दिवस- दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, महात्मा फुलेनगर, संत तुकारामनगर, नाणेकर चाळ, रमाबाईनगर, भाटनगर-पिंपरी, पिंपरी भाजी मंडई, मिलिंदनगर, पिंपरी गाव.
संजोग वाघेरे नाही, उषा वाघेरे आमच्यासमवेत
माजी महापौर संजोग वाघेरे हे शिवसेना उध्दव ठाकरे पक्षासोबत आहेत. त्यांना त्यांचे विचार पटल्याने ते तिकडे आहेत. तर, माजी नगरसेविका उषा वाघेरे या आमच्यासोबत आहेत. असे चित्र अनेक कुटुंबात आहे. आमच्या पवार कुटुंबातही असे चित्र असल्याचे अजित पवारांनी सांगताच हास्या पिकला. संजोग वाघेरे राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये घरवापसी करणार का, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली