

पिंपरी: तळेगावजवळील कुंडमळा येथे रविवारी (दि. 15) इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेचा तळेगाव दाभाडे पोलिस कसून तपास करीत आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत चौघांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपस्थित लोकांचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दुर्घटनास्थळी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भर गर्दीत पूल कोसळला होता. या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून, 50 पेक्षा अधिक जखमी आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याने अजूनही काही नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून अद्याप अपूर्ण असलेली बेपत्ता यादीही पुन्हा पडताळून घेतली जात आहे. (Latest Pimpri News)
दरम्यान, दुर्घटनेनंतर उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 35 जखमींना सोमवारी (दि. 16) प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, 15 जणांवर उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या पर्यटकांपैकी 11 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा, मृतांची ओळख पटविणे, आणि जखमी व साक्षीदारांच्या प्राथमिक जबाबांची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या या प्रकरणात ’अकस्मात मृत्यू’ची नोंद घेण्यात आली आहे.
पोलिसांकडून घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थ, पर्यटक, आणि व्यावसायिकांचे सखोल जबाब घेतले जात आहेत. त्याचबरोबर, घटनास्थळी मोबाईलमध्ये कैद झालेली व्हिडीओ क्लिप, फोटो, व सीसीटीव्ही फुटेज यांचाही तपास सुरू आहे.
पोलिस तपासाचा एक भाग म्हणून, या पुलाविषयी ग्रामपंचायत व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी दिलेल्या सूचनांच्या नोंदी मागविण्यात आल्या आहेत. पूल जुना असूनही त्यावर नियंत्रणासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली होती का, त्यासाठी शासकीय विभाग जबाबदार धरले जाईल का, याचीही चाचपणी सुरू आहे.
ग्रामपंचायतीने दिला होता इशारा
ग्रामपंचायतीने ’पूल धोकादायक आहे, वाहनांसाठी वापर न करता फक्त पादचार्यांसाठीच वापर करावा’ अशी सूचना दिली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्षात दुचाकींसह मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ या पुलावर सुरू होती.
पुरावे गोळा आणि अहवाल प्रक्रिया
पोलिसांकडून सध्या मृत व्यक्तींच्या शवविच्छेदन अहवाल, जखमींनी दिलेल्या अधिकृत जबाब, आणि घटनास्थळी उपस्थित स्वयंसेवक, व्यापारी, व स्थानिक प्रतिनिधींचे सविस्तर निवेदन गोळा केले जात आहे. तसेच घटनेच्या वेळेचा व्हिडीओ पुरावा, मोबाईल फुटेज आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स यांचादेखील फॉरेन्सिक दृष्टीने अभ्यास सुरू आहे.
गुन्हा दाखल होणार ?
प्राथमिक तपासात घातपाताचे कोणतेही स्पष्ट संकेत अद्याप समोर आले नसले, तरी गंभीर निष्काळजीपणा, सार्वजनिक सुरक्षेचा अभाव, आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका पुढील तपासाचा भाग असणार आहे. पोलिसांनी सर्व पुरावे संकलित केल्यानंतर पुढील तपासासाठी सदोष मनुष्यवध किंवा इतर कलमांचा विचार होण्याची शक्यता आहे.
दुर्घटनेनंतर लगेचच तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उपस्थितांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे. तसेच, सोमवारी दिवसभर शोधमोहीमदेखील राबवण्यात आली आहे.
- प्रदीप रायन्नवर, वरिष्ठ निरीक्षक, पिंपरी-चिंचवड.