

पिंपरी: दहावीच्या परीक्षेत 39 टक्के इतके कमी गुण मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून सोळा वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 13) दुपारी दीडच्या सुमारास चर्होली फाटा येथील तनिष्क सोसायटीत उघडकीस आली.मुलीचे वडील बँकेत नोकरीला असून ती आई, वडील, मोठी बहीण आणि छोटा भाऊ यांच्यासमवेत राहत होती. (Latest Pimpri News)
मंगळवारी (दि. 13) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (एसएससी) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मुलीनेही दहावीची परीक्षा दिली होती. दुपारी एकच्या सुमारास तिने मोबाईलवर निकाल पाहिला. त्यानंतर काही वेळात ती घरातील शयनगृहात गेली.
बराच वेळ झाल्यानंतरही ती बाहेर न आल्याने तिच्या आईने खोलीत पाहिले असता मुलगी साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हे पाहून आईने एकच हंबरडा फोडला. आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी तातडीने दिघी पोलिसांना याची माहिती दिली. मुलीला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दिघी पोलिस तपास करीत आहेत.