11th Admissions: अकरावी, आयटीआय, तंत्र शिक्षण प्रवेशासाठी चुरस
पुणे: दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी-पालकांचे लक्ष अकरावी, डिप्लोमा, आयटीआय प्रवेशाकडे लागले असून, या तिन्ही अभ्यासक्रमांपैकी अकरावी प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया 18 मेपासून सुरू करण्यात येणार असून, येत्या काही दिवसांमध्ये तंत्र शिक्षण डिप्लोमा तसेच आयटीआयसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
त्यानुसार विद्यार्थ्यांना वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. यंदा 81 हजार 809 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण, तर 1 लाख 56 हजार 375 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस राहणार आहे. (Latest Pune News)
यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत आहे. त्यानुसार सध्या महाविद्यालयांची नोंदणी सुरू आहे. राज्यातील एकूण 11 हजार 679 महाविद्यालयांच्या नोंदणीचे काम सुरू असून, त्यापैकी 5 हजार 963 महाविद्यालयांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.
त्यांची पडताळणी व प्रमाणीकरण सर्व विभागीय उपसंचालकस्तरावर सुरू आहे. उर्वरित महाविद्यालयांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्यात तब्बल 16 लाख जागांवर अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया लवकरच
दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी साधारण 1 लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी https://admission.dvet.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी.
आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून दीड लाखाहून अधिक जागा उपलब्ध होत्या. आयटीआय प्रवेशाकडे दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे अकरावीपेक्षा जास्त चुरस आयटीआय प्रवेशासाठी पाहायला मिळते. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.

