

पिंपरी : राज्यात वाढती अल्पवयीन गुन्हेगारी ही पोलिसांसह संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय बनली आहे. वयाच्या अठराव्या वर्षाच्या आतच अनेक मुले हाणामारी, चोरी, लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत अडकताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘टॉक टू मी’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने विशेष संवादात्मक उपक्रम हाती घेतला आहे.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात, मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने गुन्ह्यांत अडकलेल्या अल्पवयीन मुलांचे ‘ब—ेन मॅपिंग’ केले जाणार आहे. या प्रक्रियेमध्ये मुलांच्या विचारप्रक्रिया, भावनिक प्रतिक्रिया आणि मानसिक प्रवृत्तींचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या वर्तनमागील मूळ कारणांचा मागोवा घेऊन, प्रत्येक मुलासाठी योग्य मार्गदर्शन आणि पुनर्वसनासाठी विशिष्ट रणनीती तयार केली जाणार आहे.
मानसोपचार तज्ज्ञ मुलांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या वागणुकीमागील भावनिक कारणांचा अभ्यास करणार आहेत. त्यांचा राग, नैराश्य, भीती यामागची पार्श्वभूमी समजून घेऊन, त्यांना सकारात्मक पर्याय सूचवले जातील. या संवादातून मुलांना समाजाशी पुन्हा जोडण्याचा आणि त्यांना पुन्हा शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संवाद सत्रानंतर मानसोपचार तज्ज्ञ पोलिसांना याबाबतचा सविस्तर अहवाल देणार आहेत.
अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी यापूर्वीही दिशा फाउंडेशनच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. विशेषतः झोपडपट्टी भागातील मुलांना रोजगार आणि खेळ प्रशिक्षणाच्या माध्यमातून गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळाले आहे. मात्र, ही समस्या पूर्णतः नियंत्रणात आली नाही. त्यामुळे यंदा मानसिक समुपदेशन आणि व्यक्तीकेंद्रित हस्तक्षेपावर भर दिला जात आहे. आतापर्यंत मुलांच्या गट पातळीवर काम केले जात होते. मात्र, यापुढे प्रत्येक मुलाची वर्तनशैली, मानसिक स्थिती आणि पार्श्वभूमीचा सखोल वैयक्तिक अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना आखण्यात येणार आहेत. यामुळे अधिक प्रभावीपणे मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणता येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे
अल्पवयीन मुलांशी संवाद सत्र हा कार्यक्रम पोलिस मुख्यालय, निगडी येथील प्रशिक्षण हॉलमध्ये होणार आहे. 7 ते 12 एप्रिलदरम्यान दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुलांचे समुपदेशन केले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील गुन्ह्यात अडकलेल्या अल्पवयीन मुलांची यादी तयार करून ती आयुक्तालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ मुलेच नाही, तर त्यांच्यासोबत एका पालकाचीही उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
गुन्ह्यात अडकलेल्या अल्पवयीन मुलांकडे फक्त गुन्हेगार म्हणून न पाहता, ते समाजाचे जबाबदार नागरिक होऊ शकतात, हा विश्वास ठेवून त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन त्या प्रवृत्तीवर उपाय शोधणं हेच पोलिसांचं खर्या अर्थाने सामाजिक उत्तरदायित्व आहे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड