

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
आयर्नमॅन अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुंबई येथे बदली करण्यात आली. तर, विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांची शहराचे नवे आयुक्त म्हणून वर्णी लागली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी (दि. २०) रात्री याबाबतचे आदेश काढण्यात आले.
कृष्ण प्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा, मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून ५ सप्टेंबर २०२० रोजी पदभार स्वीकारला होता. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पावणे दोन वर्षात त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली. अवैध धंद्याना चाप लावत जुगार, मटका बंद केला. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले होते. तसेच, बँकिंक क्षेत्रातील घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळल्याने व्हाईट काॅलर गुन्हेगारांनीही त्यांचा धसका घेतला होता. निवडणुकीपुर्वी त्यांची बदली झाल्याने अनेक उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.