

बीजिंग : चीनने फ्रान्सची राजधानी पॅरिसची 'कॉपी' असलेले एक शहर बनवले आहे. या शहरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर पेट्रोल पंप आहे हे विशेष! या शहराचे नाव आहे चोंगकिंग. तिथे अनेक चित्रविचित्र गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्येच या पाचव्या मजल्यावरील पेट्रोल पंपचा समावेश आहे. या पेट्रोल पंपमध्ये लोक कसे जात असतील याचेही सर्वांना कुतुहल वाटू शकते! याच शहरात पाण्यावर तरंगणारी इमारतही पाहायला मिळते.
चीनचे हे शहर 'माऊंटन सिटी' म्हणूनही ओळखले जाते. उंच पर्वतराजीमध्ये हे शहर वसलेले आहे. तेथील इमारतींची उंची इतर इमारतींच्या हिशेबाने तिसर्या मजल्यापासून सुरू होते! डोंगर कापून हे शहर वसवले गेले आहे. मात्र, तरीही या शहरात अनेक सुविधा आहेत. पाचव्या मजल्यावर जो पेट्रोल पंप आहे त्याच्या समांतर असा एक रस्ता बाजूच्या डोंगरातून जातो.
या रस्त्याला लागूनच हा पेट्रोल पंप असून रस्त्यावरून ये-जा करणारे लोक आपली वाहने घेऊन या पंपावर सहजपणे जातात. इमारतीच्या पुढील बाजूने पाहिल्यावर मात्र हा पेट्रोल पंप चक्क पाचव्या मजल्यावर असल्याचे दिसते. अर्थात ही पुढील बाजू डोंगरउतारावरील आहे. या अनोख्या शहरात पाण्यावर तरंगणार्या इमारतीही आहेत. तसेच अनेक वळणावळणाचे रस्ते या शहरात आहेत. इमारतीमधून जाणारी रेल्वेही या शहरात पाहायला मिळते!