

पोटदुखी, उलट्या, नॉशिआ, संडासमधून रक्त पडणे, वेदनादायक पोटाची किंवा आतड्यांची हालचाल यापैकी कोणतीही लक्षणे आपल्याला जाणवत असली, तर आपल्याला पोटाचा अल्सर किंवा पेप्टिक अल्सर झाला असण्याचा संभव असू शकतो. आपल्याला नेमका काय त्रास होतोय आणि आपल्यावर बरोबर आणि योग्य उपचार केले जात आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी रोगाविषयी संपूर्ण माहिती घेणे महत्त्वाचे ठरते.
आतड्याच्या पेशींच्या आवरणाला छेद किंवा कापल्यासारखे झाले म्हणजे पोटाचा किंवा पेप्टिक अल्सर झाला असे म्हणतात. श्लेष्मल त्वचेचा एकावर एक असा थरापासून आतडे तयार होते. या आतल्या थराला हे अल्सर होत असतात. सतत बाहेरचे खाणे, ताण, धूम्रपान, मद्यपान ही पोटाचा अल्सर होण्याची मुख्य कारणे आहेत, असा काहीसा चुकीचा समज गेली काही वर्षे होता. पण, पोटाचा अल्सर हा जंतूंच्या संसर्गामुळे विशेषतः हेलिकोबॅक्टर पायलोरी या सूक्ष्मजंतूंमुळे होतो हे मान्य झाले आहे.
पोटाच्या 65 टक्केभागात हेलिकोबॅक्टर पायलोरीचा संसर्ग झाल्यामुळे अल्सर होतो. हृदयविकाराचा झटका किंवा लकवा टाळण्यासाठी नियमितपणे घेतली जाणारी अस्पिरिन किंवा क्लोपायडोग्रेल सारखी औषधे किंवा आथ्राईटिससाठी घेतल्या जाणार्या गोळ्या ह्या अल्सर होण्यास कारणीभूत ठरतात. दाह होऊ नये म्हणून घेतल्या जाणार्या औषधांमुळेही पाचपेैकी दोन वेळा पोटाचे अल्सर होत असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठांमध्ये पोटाचा कर्करोग हा पोटाचा अल्सर स्वरूपातही असू शकतो.
काही वेळेला पोटाच्या अल्सरची काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. पण, काही अल्सरची वाईट लक्षणं दिसून येतात आणि त्यामुळे गंभीर परिणामही होतात. यामध्ये बरगड्यांच्या खाली दुखणे, अपचन, नॉशिया, पोट बिघडणे, उलट्या, वजन कमी होणे, उलटी किंवा संडास यांमधून रक्तपडणे, अशक्तपणाची लक्षणे, डोके हलके होणे आणि रक्तपात होणे यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्येष्ठांमधील पोटातील रक्तस्राव हा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा धक्काही बसू शकतो.
एंडोस्कोपी करून याची तपासणी करता येते. ज्यामध्ये थोडी भूल देऊन अन्ननलिकेच्या माध्यमातून एक पातळ लवचिक अशी ट्यूब पोटात घातली जाते. त्यामध्ये छोटासा कॅमेरा बसवलेला असतो, ज्याद्वारे पोटात अल्सर आहे का, हे डॉक्टर पाहू शकतात. तर बेरियम मील ह्या पद्धतीत पांढर्या रंगाचा द्रव पदार्थ रुग्णाला प्यायला देऊन एक्स-रे काढला जातो. ही पद्धत हल्ली फार कमी वेळा वापरली जाते. पण, एन्डोस्कोपी चाचणी उपलब्ध नसल्यास याचाही फायदा होतो. बायोप्सीमध्ये एन्डोस्कोपी करताना पेशींचा एक लहानसा नमुना घेतला जातो आणि तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला जातो. पण, ही तपासणी जर पोटाचा अल्सर किंवा गॅस्ट्रिक अल्सर आढळून आल्यास केली जाते. हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या सूक्ष्मजंतूंचा संसर्ग पोटात झाला आहे का, हे पाहण्यासाठी सी-14 नावाची श्वासाची चाचणी घेतली जाते.
प्रतिजैविके, शरीरातील आम्लाचे प्रमाण कमी करणे आणि जीवनशैलीतील काही बदल जसे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळणे, धूम्रपान, मद्यपान बंद करणे या उपायांनी पोटाचा अल्सर किंवा पेप्टिक अल्सर यावर उपचार केले जाऊ शकतात. पेप्टिक अल्सरमुळे वेदना तर होतातच; पण त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. तसेच अन्नसेवन करणे आणि आयुष्यातील इतर गोष्टींचा आनंद लुटणे देखील शक्य होत नाही.