

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा चर्चेतील 'पठाण' चित्रपट सिनेमागृहात रिलीज होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. बुधवारी (दि. २५) हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता एक मोठी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे शाहरुख खानसहित निर्मात्यांची झोप उडाली आहे. 'पठाण' चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लीक झाला आहे. (Pathaan Movie Leaked)
लीक झालेल्या 'पठाण' चित्रपटाची एचडी प्रिंट ऑनलाईन उपलब्ध असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे आता जे लोक चित्रपट पाहण्यास इच्छुक होते त्यांना आता घरबसल्या चित्रपटाची मेजवानी मिळत आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो. चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याच्या बातमीने निर्मात्यांची चिंता वाढली आहे. जर हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला तर बॉक्स ऑफिसवर त्याचा मोठा परिणाम होईल, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. ज्या वेबसाईट्सवर हा चित्रपट लीक झाला आहे त्यांच्यावर निर्माते कठोर कारवाई करतील असा अंदाज आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. (Pathaan Movie Leaked )
गेले कित्येक दिवस हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पहायला मिळाला. यातील बेशर्म या गाण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तेव्हापासून या चित्रपटाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र आता चित्रपटच लीक झाल्यामुळे निर्मात्यांची चिंता आणखी वाढली आहे. Tamilrockers, Filmy4wap, Filmyzilla, Mp4movies, Pagalworld आणि Vegamovies या वेबसाइट्सवर हा चित्रपट सध्या लीक झाला आहे.
याआधी 'पठाण'चा ट्रेलरही लीक झाला होता आणि आता या चित्रपट लीक झाल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यापूर्वी पठाणच्या आगाऊ बुकिंगला तिकीट खिडकीवर उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शाहरुख खानचा 'पठाण' बॉक्स ऑफिसवर 45 ते 50 कोटी रुपयांची कमाई करू शकतो आणि हा आकडा 60 कोटींपर्यंत देखील पोहोचू शकतो, असा विश्वास उद्योग तज्ञांनी वर्तविला आहे. मात्र आता लीक प्रकरणामुळे चित्रपटाच्या कमाईबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
हेही वाचा