

मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशस्त रस्तेही वाहतुकीस अपुरे पडत आहेत, तर, दुसरीकडे पार्किंगची समस्या जटील बनत चालली आहे. महापालिका प्रशासन पार्किंग विकसित करण्याकडे दुर्लक्ष करीत असून, रस्ते व पदपथावर बेशिस्तपणे वाहने पार्क करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील पार्किंगची समस्या पुण्याप्रमाणे गंभीर रूप घेत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या पुढे गेली आहे. आरटीओच्या आकडेवारीनुसार शहरात 5 लाखांपेक्षा अधिक वाहने रस्त्यांवर धावतात. त्यामुळे प्रशस्त रस्ते वाहतुकीस अपुरे पडत आहेत. वाहन चालकांना वाहन पार्क करण्यासाठी जागा शोधावी लागते. रस्ता, पदपथावर वाहने पार्क करण्याचे बेशिस्तीचे प्रमाण वाढले आहे. तसेच, घरासमोरील रस्ते महिनोमहिने वाहनांनी अडवून ठेवल्याचे दिसून येत आहे.
रस्ता अरुंद होऊन कोंडीत भर पडत आहे. काही प्रसंगी वाहने अडकून पडतात. त्याबाबत जनसंवाद सभेत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. तसेच, अनेक भागात दाटीवाटीच्या उभ्या असलेल्या अनधिकृत इमारती अणि बेशिस्त पार्किंगमुळे अग्निशामक बंब किंवा रुग्णवाहिकाही ये-जा करण्यास जागा उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्याकडे पालिका प्रशासन गांभीर्याने कठोर पावले उचलत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पार्किंगसाठीच्या तीन इमारतीच्या निविदेस प्रतिसाद नाही
पिंपरी येथील भाजी मंडई व इंदिरा गांधी उड्डाण पुलाजवळील क्रोमा शो रूमजवळ आणि चिंचवड रेल्वे स्थानकामागील ग क्षेत्रीय कार्यालयाजवळील महापालिकेच्या जागेत बहुमजली वाहनतळासाठी पीपीपी तत्त्वावर इमारत बांधण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. हे पार्किंग सशुल्क असणार होते. तीन वेळा मुदतवाढ देऊनही त्या निविदेस प्रतिसाद मिळालेला नाही.
बीआरटीएर्सवरील नियोजित पार्किंग गायब
शहरात सहा ठिकाणी मार्गावर बीआरटीएस विकसित करण्यात आली आहे. पीएमपीएलच्या प्रवाशांसाठी त्या मार्गावर पार्किंगसाठी जागा सोडण्यात आल्या होत्या. तसेच, काही हाउसिंग सोसायटीत पार्किंगसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या सर्वच जागांवर पार्किंग सुरू करण्यास पालिका अपयशी ठरली आहे. काही जागा बांधकाम व्यावसायिकांनी हडप केल्या आहेत.
महामेट्रोचे आश्वासनही हवेत
शहरात दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो मार्गिका तयार झाली आहे. प्रवाशांच्या सोईसाठी अनेक ठिकाणी पार्किग व्यवस्था निर्माण करण्याची ग्वाही महामेट्रोने दिली होती. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने महामेट्रोला शहरातील अनेक जागा भाड्याने दिल्या. मात्र, पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो सुरू होऊन वर्ष होत आले तरी अद्याप एकाही ठिकाणी मेट्रोने पार्किंग झोन तयार केलेला नाही. त्यामुळे वाहने चक्क पदपथ व रस्त्यावर उभी केली जात आहेत.
'स्मार्ट पार्किंग'ची सेवाही अद्याप कागदावरच
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने संपूर्ण शहरात 'स्मार्ट पार्किंग' निर्माण केली जाणार होती. त्याबाबत भरभरून स्वप्ने दाखविण्यात आली. पार्किंगसाठी जागा कोठे उपलब्ध आहे, हे मोबाईल अॅपवर दाखविले जाणार होते. तसेच, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्मार्ट सिग्नल व्यवस्था निर्माण केली जाणार होती. त्यासह पार्किंग व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील, असे स्मार्ट सिटी कंपनीने सांगितले होते. मात्र, सर्व कामे अंतिम टप्प्यात येऊनही त्याबाबत अजूनपर्यंत काहीच कार्यवाही नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
पे अॅण्ड पार्क योजना सुधारणा करून पुन्हा राबविणार
शहरात वाहतनळ निर्माण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्या दृष्टीने कार्यवाही केली जात आहे. पिंपरीतील दोन व चिंचवड येथील बहुमजली वाहनतळ उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. शहरातील ऑन स्ट्रीट पे अॅण्ड पार्क योजनेत सुधारणा करून ती पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांचे सहाय घेण्यात येत आहे. वाहनचालकांसाठी मोबाईल अॅपही विकसित करण्यात आले आहे. पालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर वाहनतळ सुरू करण्यात येत आहेत, असे महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.