

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics Hockey : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंड हॉकी संघाचा पराभव केला. भारताकडून सामन्यातील दोन्ही गोल हरमनप्रीत सिंगने केले. भारतीय संघाचा हा दुसरा विजय आहे. याआधी अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरी सुटला होता. दुसरीकडे, आयरिश संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरी सुटल्यानंतर भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या पण भारतीय खेळाडूंना विरोधी संघाचे गोलजाळे भेदता आले नाही. पण हरमनप्रीतने सामन्याच्या 11व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये ही आघाडी कायम राहिली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचा दबदबा दिसून आला. याच हरमनप्रीतने सामन्याच्या 19व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल केला.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये आयर्लंडला पहिला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला, ज्यावर आयरीश खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केला. मात्र, भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या सतर्कतेवर त्यांना मात करता आली नाही. यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये आयरिश संघाने काही आक्रमक प्रयत्न केले. ज्यात ते अपयशी ठरले. अखेर तिसरे आणि चौथे क्वार्टर गोलशून्यमध्ये संपुष्टात आले.
टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने या सामन्यात सलग दोन गोल केले. यासह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याच्या खात्यात 4 गोल जमा झाले आहेत. या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक गोल करणारा तो पुरुष खेळाडू ठरला आहे. हरमनप्रीतने तिन्ही सामन्यांमध्ये गोल केले आहेत.
भारताला आयर्लंडविरुद्ध 9 पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्यातील एकाच पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात यश आले. भारताला पेनल्टी कॉर्नरच्या या कमकुवतपणावर मात करावी लागणार आहे. गेल्या तीन सामन्यांमध्ये भारताला 22 पेनल्टी कॉर्नर मिळाले आहेत. भारतीय हॉकी संघाला यापैकी केवळ तीनच गोल करता आले आहेत.
आयर्लंडचा बचाव भेदत भारताने 11व्या मिनिटाला गोलपोस्ट गाठले. यावेळी आयरिश डिफेंडरने भारतीय खेळाडूला चुकीच्या पद्धतीने पाडले. त्यामुळे रेफ्रींनी लगेच पेनल्टी स्ट्रोक दिला, ज्याला हरमनप्रीत कौरने गोलमध्ये बदलण्यात कोणतीही चूक केली नाही.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने सुरुवातीपासूनच आक्रमण केले. ज्यामुळे पहिल्या 4 मिनिटांत तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. यातील तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर झाले. हरमनप्रीत सिंगने पुन्हा एकदा आयर्लंडचे गोलजाळे भेदले. याचबरोबर त्याने स्पर्धेतील गोलचा चौकार लगावला.
तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचा दबदबा कायम राहिला. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच आयर्लंडवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. तिसऱ्या क्वार्टरच्या पाचव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण गोल झाला नाही. आयर्लंडनेही प्रतिआक्रमण करत पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, त्यांचेही गोल खाते रिकामेच राहिले.
आयर्लंडवरील विजयासह भारतीय हॉकी संघ सध्या पूल-बीमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर एल सामना बरोबरीत राहिला आहे. या पूलमध्ये बेल्जियमचा संघ 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 2 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता पुढे भारताला आपल्या पूलमध्ये बेल्जियम आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. हे सामने अनुक्रमे 1 आणि 2 ऑगस्ट रोजी खेळवले जाणार आहेत.