

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 Day 2 : ऑलिम्पिक 2024 च्या दुस-या दिवशी (28 जुलै) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पीव्ही सिंधू, बलराज पनवार, रमिता जिंदाल यांनी पुढील फेरीत आपले स्थान पक्के केले.
भारताच्या रमिता जिंदालने रविवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत 631.5 गुणांसह अंतिम फेरी गाठली. पदक फेरीत पोहचणारी ती गेल्या 20 वर्षांत मनू भाकरनंतरची दुसरी महिला नेमबाज आहे. रमिता तिच्या प्रशिक्षक सुमा शिरूर (अथेन्स 2004) नंतर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला रायफल नेमबाज आहे. दुसरीकडे इलावेनिल वालारिवनचे पदक फेरीतील स्थान हुकले. ती 630.7 गुणांसह 10व्या स्थानावर राहिली.
बलराज पनवारने रोईंगमध्ये पुरुष एकल स्कल्सची उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह त्याने पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. 25 वर्षीय आर्मी मॅनने रिपेचेज 2 मध्ये 7:12.41 अशी वेळ नोंदवली आणि मोनॅकोच्या क्वेंटिन अँटोगानेलीला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. हा टप्पा गाठणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. तो उपांत्यपूर्व फेरीचा पुढील सामना 30 जुलै (मंगळवार) रोजी खेळणार आहे.
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. सिंधूने रविवारी (28 जुलै) महिला एकेरीच्या गट-एममधील पहिल्या सामन्यात मालदीवच्या फातिमाथ नबाहा अब्दुल रज्जाकचा सहज पराभव केला. सिंधूने हा सामना 21-9, 21-6 असा जिंकला. आता दुसऱ्या गट सामन्यात (31 जुलै) तिची लढत इस्टोनियाच्या क्रिस्टिन कुबा हिच्याशी आहे. जर तिने हा सामना जिंकला तर ती प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल.