

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 Hockey : टोकियोनंतर पॅरिसमध्येही भारताने ग्रेट ब्रिटनला पराभवाची धूळ चारून ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार गोलकीपर श्रीजेश ठरला. त्याने भक्कम बचाव करून ग्रेट ब्रिटनच्या एकामागून एक होणा-या हल्ल्यांना परतवून लावले. अवघ्या 10 खेळाडूंच्या जोरावर भारताने अविश्वनिय बचाव केला. ज्यामुळे सामना पूर्णवेळेत 1-1 असा बरोबरीत राहिला. परिणामी पेनल्टी शॉट्सवर सामन्याचा निकाल लागला. ज्यात भारताने 4-2 ने मात करून रडीचा डाव खेळणा-या ब्रिटीश संघाची पुरती जिरवली.
सामन्याच्या 17 मिनिटाला अमित रोहिदासला रेड कार्ड मिळाल्यामुळे भारतीय संघाला 10 खेळाडूंसह खेळला. मात्र, भारतीय संघाने हार न मानता अखेरपर्यंत ब्रिटनला कडवी झुंज दिली. अशा प्रकारे भारतीय संघाने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारत उपांत्य फेरीत विजय मिळवण्यात यशस्वी ठरला, तर किमान रौप्यपदक निश्चित होईल. भारताचा उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी (6 ऑगस्ट) खेळला जाणार आहे.
ग्रेट ब्रिटनने या सामन्यात वेगवान सुरुवात करून भारताला दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीम इंडियाने शानदार बचाव केला. ग्रेट ब्रिटनने पाचव्या मिनिटाला चढाई केली, जी अयशस्वी ठरली. पण यावेळी ब्रिटनने रिव्ह्यू घेतला ज्यानंतर त्यांना सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण भारतीय गोलकीपर श्रीजेश आणि बचावफळीने शानदार खेळ करून प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण परतवून लावले. सात मिनिटांच्या बचावात्मक खेळानंतर टीम इंडियाने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. 11व्या मिनिटाला अभिषेकने टीम इंडियासाठी पहिली संधी निर्माण केली ज्यामध्ये त्याचा अगदी जवळून गोल हुकला. 13व्या मिनिटाला भारताला लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण तिन्ही वेळा टीम इंडिया अपयशी ठरली. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र गोल होऊ शकला नाही.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच भारताला मोठा झटका बसला. भारताच्या अमित रोहिदासला 17व्या मिनिटाला लाल कार्ड देण्यात आले. रोहिदासची हॉकी स्टिक ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूच्या डोक्यावर लागली. ज्यानंतर ब्रिटीश खेळाडू मैदानावर पडला आणि तळमळण्याचे नाटक करू लागला. या घटनेची व्हिडिओ पंचांनी दखल घेतली. त्यांनी रिप्ले बघून अमितने जाणूनबुजून स्टीक मारल्याचे सांगितले. अशा स्थितीत व्हिडीओ पंचांच्या सल्ल्यानुसार मैदानी पंचांनी अमितला रेड कार्ड दाखवले. दरम्यान अमितकडून ही कृती जाणूनबुजून झाली नसल्याचे भारतीय खेळाडूंनी स्पष्ट केले पण त्याचा काही परिणाम झाला नाही. अखेर अमितल मैदान सोडून जावे लागले. परिणामी टीम इंडियाला पुढची 43 मिनिटे 10 खेळाडूंसह खेळावे लागेल. भारताचा एक खेळाडू कमी झाल्याने ब्रिटनचे मनोबल वाढले. ते सतत हल्ले करत होते. 19व्या मिनिटाला ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्यावर त्यांना यश मिळवता आले नाही. यानंतर टीम इंडियाने पलटवार केला. ब्रिटनच्या डीमध्ये कूच केली. विवेक सागरने क्लिअर केलेला चेंडू अभिषेकपर्यंत पोहोचला. त्याने गोलजाळे भेदण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फटका चुकला.
सामन्यातील गोलचा दुष्काळ 22 व्या मिनिटाला संपुष्टात आला. यावेळी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीतने चेंडू नेटमध्ये टाकण्यात कोणतीही चूक केली नाही. या ऑलिम्पिकमधील हरमनप्रीतचा हा सातवा गोल ठरला. दुसरा क्वार्टर संपण्याच्या चार मिनिटे आधी ब्रिटनला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. पण त्यांना आपले खातेही उघडता आले नाही. त्यांनी 27व्या मिनिटाला मेहनत घेतल्यानंतर बरोबरीचा गोल केला. डाव्या बाजूने चेंडू गोलपोस्टसमोर उभ्या असलेल्या डीच्या आत ली मॉर्टनकडे आला. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा करून 1-1 अशी बरोबरी साधली. या स्कोअरसह दुसरा क्वार्टर संपला.
बरोबरीचा गोल केल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेल्या ब्रिटीशांनी तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच आक्रमण केले. पण श्रीजेशने गोल वाचवण्यात यशस्वी झाला पण तो यादरम्यान जखमी झाला. 34व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि श्रीजेशने दोन्ही वेळा धोका टाळला. 40व्या मिनिटाला श्रीजेशने पुन्हा पेनल्टी कॉर्नर वाचवून ग्रेट ब्रिटनला आघाडी घेण्यापासून रोखले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना यश मिळाले नाही. क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी भारताच्या सुमितला ग्रीन कार्ड मिळाले.
सुमितला ग्रीन कार्ड मिळाल्यामुळे चौथ्या क्वार्टरची पहिली दोन मिनिटे भारत नऊ खेळाडूंसह खेळला. ग्रेट ब्रिटनने आक्रमण सुरूच ठेवले. 56व्या मिनिटाला ब्रिटनने काउंटर ॲटॅक केला, पण श्रीजेश पुन्हा एकदा त्यांच्या मार्गात अडथळा ठरला. ज्यामुळे ब्रिटनला निराश व्हावे लागले. श्रीजेशने 57व्या मिनिटाला पुन्हा एकदा अप्रतिम बचाव केला. या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
ग्रेट ब्रिटनने शूटआउटला सुरुवात केली आणि जेम्स हेन्रीने पहिल्या संधीवर गोल केला. कर्णधार हरमनप्रीतनेही मिळालेल्या संधीचे सोने करत गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी जॅक वॉलेसने पुन्हा गोल केला. सुखजित सिंगने टीम इंडियाला पुन्हा बरोबरी मिळवून दिली. तिसऱ्या शॉटमध्ये कोनोर विल्यमसनने चेंडू बाहेर मारला. ललित उपाध्यायने गोल करत भारताला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. ब्रिटनचा पुढचा प्रयत्न श्रीजेशने उधळून लावला आणि गोल वाचवला. त्यानंतर राजपालने गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
श्रीजेश भिंतीसारखा उभा राहिला
जर स्कोअरलाइन 1-1 अशी बरोबरी राहिली तर ती श्रीजेशमुळेच. कारण त्याने ब्रिटनचे अनेक हल्ले हाणून पाडले. यात भारताच्या बचावफळीचाही वाटा राहिला, पण असे काही प्रसंग आले जेव्हा ब्रिटनने भारतीय बचावपटूंना ओलांडले पण त्यांच्या आक्रमणासमोर श्रीजेश भिंतीसारखा उभा राहिला. हे आकडेवारीवरून चांगले समजू शकते. ब्रिटनने भारताच्या गोलवर एकूण 21 शॉट्स मारले, पण त्यांना एकदाच यश आले.
ब्रिटनने पहिला शूटआउट घेतला आणि अल्बरी जेम्सीने गोल केला.
भारताकडून पहिला शॉट घेण्यासाठी हरमनप्रीत सिंग आला आणि त्यानेही गोल केला.
ब्रिटनसाठी वॉलेस दुसरा शॉट घेण्यासाठी आला आणि त्याने गोल केला.
भारतासाठी सुखजीत आला आणि त्याने गोल करत स्कोअर 2-2 अशी बरोबरीत आणला.
ब्रिटनाचा तिसरा प्रयत्न क्रोनन चुकवला.
ललितने भारतासाठी तिसऱ्या प्रयत्नात गोल केला आणि भारताला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
चौथ्या प्रयत्नातही इंग्लंडला गोल करता आला नाही. श्रीजेशने यशस्वी बचाव केला.
भारतासाठी चौथ्या प्रयत्नात राजकुमारने गोल केला.
अशाप्रकारे भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.