

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीने आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करताना वैयक्तिक गटात क्वार्टर फायनल (उपांत्यपूर्व फेरीत) मध्ये प्रवेश केला. आज प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिने जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनचा पराभव केला. या विजयासह तिने क्वार्टर फायनलमध्ये धडक देत पदकाच्या दिशेने आगेकूच केली आहे. यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक जिंकण्याची आशा आहे.
आज दीपिका कुमारीची वैयक्तिक गटात प्री-क्वार्टर फायनल जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनशी झाली. पहिल्या सेटमध्ये दिपिकाने २७ गुण घेत २-० अशी आघाडी घेतली. दुसरा सेट २७-२७ असा बरोबरीत राहिला. तिसरा सेट २६-२५ गुणांनी जिंकत ५-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये जर्मनीच्या मिशेलने अचूक वेध घेत सामन्यात बरोबरी साधली. दीपिकाने पाचवा सेट २७-२७ असा बरोबरीत सोडवला आणि विजयासाठी आवश्यक असलेला एक गुण मिळवला. तिने जर्मनीच्या मिशेल क्रॉपेनचा ६-४ असा पराभव केला.
दीपिका कुमारीने पहिल्या फेरीत शूट-ऑफमध्ये एस्टोनियाच्या रीना परनाटचा ६.५ ने पराभव करून ३२ व्या फेरीत प्रवेश केला होता. ३२ व्या फेरीतील तिचा पुढचा सामना नेदरलँडच्या रोफेन क्विंटी सोबत झाला. यात दीपिकाने एकतर्फी विजय मिळवला. तिने ६.२ गुणांसह सामना जिंकून १६ व्या फेरीत प्रवेश केला होता.
दीपिका कुमारी हे भारतातील तिरंदाजीमधील मोठे नाव आहे. यावेळी ती तिची चौथी ऑलिम्पिक स्पर्धा खेळत आहे. यावेळी ती ज्या पद्धतीने परफॉर्म करत आहे, त्यावरून पदक मिळण्याची आशा आहे. तिला अजून काही सामने खेळायचे आहेत, त्यानंतर ती पदकाची प्रबळ दावेदार बनेल.