Paris Olympics 2024 : तिरंदाजीतील पदकाचा 36 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येणार? ऑलिम्पिक मोहिमेला उद्यापासून सुरुवात

Paris Olympics 2024 Archery
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय तिरंदाजी संघ प्रथमच पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 Archery : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय तिरंदाजी संघ प्रथमच पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. 1988 मध्ये ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीचा समावेश करण्यात आला होता आणि तेव्हापासून भारतीय तिरंदाज जवळपास प्रत्येक ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होत आहेत, परंतु आतापर्यंत ते ‘पोडियम’वर पोहोचण्यात अपयशी ठरले आहेत. आता, पुन्हा नव्याने संधी मिळाली आहे. आपल्या तिरंदाजांनी अचूक निशाणा साधून ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवावे यासाठी भारतीय क्रिडा रसिकही मनोमन प्रार्थना करत आहेत.

भारतीय तिरंदाज पॅरिस ऑलिम्पिकमधील त्यांच्या मोहिमेला गुरुवारी (दि.25) लेस इनव्हॅलिडेस गार्डन येथे पात्रता फेरीने सुरुवात करतील. पुरुष सांघिक अंतिम फेरी सोमवारपासून सुरू होईल, तर वैयक्तिक एलिमिनेशन राऊंड मंगळवारी सुरू होईल. मिश्र सांघिक अंतिम फेरी पुढील शुक्रवारी होतील आणि महिला आणि वैयक्तिक अंतिम फेरी त्याच आठवड्याच्या शेवटी होतील.

Paris Olympics 2024 Archery : भारतीय तिरंदाजांची उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल

सिडनी ऑलिम्पिक 2000 वगळता भारतीय तिरंदाजांनी आतापर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. पण यादरम्यान त्यांना कधीच उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाता आलेले नाही. सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये भारताचा एकही तिरंदाज स्पर्धेसाठी पात्र ठरला नव्हता. यंदा पॅरिसमध्ये या कामगिरीमध्ये सुधारणा होईल अशी सर्वांना आशा आहे.

Paris Olympics 2024 Archery : विविध 5 स्पर्धांमध्ये संघर्षपूर्ण लढत

लंडन ऑलिम्पिक 2012 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा सर्व 6 खेळाडूंचा भारतीय संघात समावेश आहे. भारतीय पुरुष आणि महिला संघ रँकिंगच्या आधारावर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून ते यावेळी विविध 5 स्पर्धांमध्ये सहभागी होतील. अनुभवी तरुणदीप राय आणि दीपिका कुमारी त्यांच्या चौथ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला पसंतीचा ड्रॉ मिळविण्यासाठी पात्रतेमध्ये किमान अव्वल 10 मध्ये स्थान मिळवावे लागेल.

Paris Olympics 2024 Archery : 53 देशांतील 128 खेळाडूंचा सहभाग

तिरंदाजीसाठी 53 देशांतील 128 खेळाडू पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत. प्रत्येक तिरंदाज 72 बाण मारेल. यातील गुणांच्या आधारे रविवारपासून सुरू होणाऱ्या मुख्य बाद फेरीसाठी सीडिंग निश्चित केले जाईल.

अनेकदा तळातील सीडेड मिळवलेल्या भारतीय संघासाठी पात्रता फेरी महत्त्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत बाद फेरीत दक्षिण कोरियासारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये काय घडले?

भारताचे सर्व पुरुष तिरंदाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये अव्वल 30 मध्येही स्थान मिळवू शकले नव्हते. भारताची एकमेव महिला तिरंदाज दीपिकाने 9वे स्थान पटकावले होते. पण तिला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित कोरियन तिरंदाजाकडून पराभव पत्करावा लागला होता.

यंदा शांघाय येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये कोरियाचा पराभव करून इतिहास रचणाऱ्या पुरुष संघाकडून भारताला मोठ्या आशा आहेत.

भारतीय संघात तरुणदीप राय, प्रवीण जाधव यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. युवा खेळाडू धीरज बोम्मादेवराकडून मोठी अपेक्षा आहे. त्याने महिनाभरापूर्वी अंतल्या विश्वचषक स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या इटलीच्या मौरो नेस्पोलीला पराभूत करून कांस्यपदक पटकावले होते.

सर्वांच्या नजरा दीपिका कुमारीवर

महिला गटात सर्वांच्या नजरा दीपिकावर असतील. आई झाल्यानंतर 16 महिन्यांत तिने शांघाय येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात रौप्य पदक जिंकून शानदार पुनरागमन केले. तिला महिला संघात अंकिता भक्त आणि भजन कौर यांची साथ मिळणार आहे. या अंकिता-भजनचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

धीरज आणि दीपिका क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिले तर त्यांच्याकडून रिकर्व मिश्र संघात पदकाची अपेक्षा केली जाऊ शकते.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय तिरंदाजी संघ

पुरुष रिकर्व

धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय, प्रवीण जाधव

महिला रिकर्व

दीपिका कुमारी, भजन कौर, अंकिता भक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news